'त्या' चार जणांना झाला कोरोना अन् गावातील लोकांनी ठोकली धूम

नामदेव माने
Friday, 12 June 2020

सकाळी सकाळी घटना घडल्याने लोक भितीने पळून गेले. सर्व व्यापाऱ्यांनी ताबडतोब दुकाने बंद केली.

कसबा बीड (कोल्हापूर) - येथील बीडशेड चौकात दुचाकी मिस्री व वेल्डींग मिस्री यांच्या गॕरेजमध्ये काम करणाऱ्या चौघांना कोरोनाची लागण झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले. सकाळी ८.३० वाजता जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली दुमालाच्या पथकाने बीडशेड येथे येऊन संपूर्ण परिसर बंद केला. बाधित झालेले तरूण हे बीडशेड, सडोली दुमाला, गर्जन व पासार्डे येथील आहेत. यांना कोरोनाची लागण कशी झाली याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. सकाळी सकाळी घटना घडल्याने लोक भितीने पळून गेले. सर्व व्यापाऱ्यांनी ताबडतोब दुकाने बंद केली.
  

कोरोना पॉझीटीव्ह सापडल्याची माहिती समजताच सरपंच व गोकुळचे संचालक सत्यजीत पाटील, उपसरपंच वैशाली सुर्यवंशी, पंचायत समिती सदस्य राजेंद्र सुर्यवंशी, ग्रामविकास अधिकारी एस. बी. पाटील, तलाठी एन. पी. पाटील, सर्कल प्रविण माने, पोलीस पाटील पंढरीनाथ ताशिलदार यांच्यासह आशा स्वंयमसेविका, अंगणवाडी सेविका आणि स्थानिक प्रशासनाचे लोक घटनास्थळी पोहचले. परिसर सील करून औषध फवारणी केली. 

कोरोनाची लागण झालेल्या तरूणांच्या घरातील लोकांची तपासणी केली. त्यांना घरातच विलगीकरण करून ठेवले आहे. तर कोरोना संक्रमित झालेल्यांना ताबडतोब १०८ रूग्णवाहिकेतून कोल्हापूर येथे सीपीआर रूग्णालयात नेण्यात आले. तसेच संक्रमित झालेल्यांच्या प्रत्येक संपर्कात आलेल्या १२ लोकांना ही स्वॕब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. 

सडोली दुमाला येथील २३ वर्षाचा तरुण पुणे येथून आल्याने त्याने खाजगी डॉक्टरांकडे आपला स्वॕब तपासणीसाठी दिला होता. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने सीपीआर येथे नेण्यात आले आहे. तसेच बीडशेड येथीलच एका खाजगी डॉक्टरकडे काहींनी स्वँब तपासणी केली होती. त्यानंतर आज शुक्रवारी बीडशेड येथील ३५ वर्षांच्या वेल्डिंग काम करणाऱ्या, त्याच्या शेजारीच असलेल्या मोटार मेकॅनिकल गॅरेजमध्ये काम करणाऱ्या गर्जन येथील २३ वर्षाच्या व पासार्डे येथील २२ वर्षाच्या युवकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले. 

हे पण वाचा - सोमवारपासून कोल्हापुरात लाॅकडाऊनची अफवाच..

दुपारी अडीच वाजता प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार शितल भांबरे-मुळे, गट विकास अधिकारी सचिन घाडगे यांनी बीडशेड, सडोली दुमाला, गर्जन व पासार्डे गावात जावून पहाणी करून स्थानिक प्रशासनाला खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. संबंधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतः हून ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्रास माहिती देऊन दवाखान्यात दाखल व्हावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

हे पण वाचा - कोरोनाच्या विळख्यातून सुटणार, पण पोलिसांच्या कचाट्यात अडकणार

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four corona positive case found in kolhapur kasba beed