ब्रेकिंग - कोल्हापूरमधील आयसीयूतील चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

गेल्या तीन महिन्यापासून शहरात एकही रूग्ण नव्हता. सलग दोन दिवस शहरातीलच बाधित आढळल्याने धक्का बसला आहे

गडहिंग्लज (कोल्हापूर) : शहरातील एका नामांकीत आयसीयूमधील चार कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल आज पॉझीटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. या सर्वांचा स्वॅब खासगी प्रयोगशाळेत तपासण्यात आला आहे. बटकणंगले (ता. गडहिंग्लज) येथील एका बाधिताच्या संपर्कात ते आले होते. कालच रात्री एका डॉक्‍टराला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. पाठोपाठ आज वैद्यकीय क्षेत्रातील या चार कर्मचाऱ्यांनाही बाधा झाल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या तीन महिन्यापासून शहरात एकही रूग्ण नव्हता. सलग दोन दिवस शहरातीलच बाधित आढळल्याने धक्का बसला आहे. काल रात्रीच एका डॉक्‍टराला लागण झाल्याचे समजल्यानंतर राजेंद्र प्रसाद रोड परिसर सील करण्यात आला आहे. या डॉक्‍टरांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्याची कार्यवाही सुरू असतानाच आज पुन्हा एका आयसीयूमध्ये काम करणाऱ्या चौघा कर्मचाऱ्यांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आयसीमधील दहा कर्मचारी बटकणंगले येथील एका बाधिताच्या संपर्कात आल्याचे कळाल्यानंतर तेथील संबंधित प्रमुख डॉक्‍टरांनी या सर्वांना आयसोलेट केले होते. सर्वांचे स्वॅब घेवून तपासणी केली. त्यात चौघांना बाधा झाल्याचे आज स्पष्ट झाले. 

या चौघांच्याही संपर्कात आलेल्यांचा शोध आता सुरू झाला आहे. वेळीच क्वारंटाईन केल्याने संसर्गाचा धोका नसल्याचे सांगण्यात येत असले तरी खबरदारी म्हणून ते कोणाकोणाच्या संपर्कात आले आहेत याची माहिती घेतली जात आहे. पालिका कर्मचारी व आरोग्य विभागाचे पथक तत्काळ संबंधित आयसीयूमध्ये जावून माहिती घेत होते. सलग दुसऱ्या दिवशी शहरात कोरोना बाधित आढळल्याने शहरवासियांत भितीचे वातावरण असून नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी आजपासून सलग पाच दिवस शहर लॉकडाऊन केल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मेडीकल, दूध विक्री केंद्रे वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. समूह संसर्ग होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. 

 

हे पण वाचा - ...अन् तलवार, कोयता, चाकू, एडका घेऊन भिडले ११ जण

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four employees of ICU in Kolhapur contracted corona