हृदयद्रावक : 24 तासात चौघांचा मृत्यू ; गावाने फोडला हंबरडा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

कळेत कुटुंबातील चौघांचा मृत्यू
आई, दोन मुलगे, वडणगेतील चुलत बहिणीचा समावेश

कुटुंबातील सात जण पॉझिटिव्ह

कळे (कोल्हापूर) :  येथील एकाच कुटुंबातील आईसह दोन मुलगे व चुलत बहिणीचा २४ तासांत मृत्यू झाल्याने कळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. आई मालूबाई पांडुरंग देसाई (वय ७०), मुलगे दीपक (वय ४२), सागर (वय ३९) अशी मृतांची नावे आहेत. चुलतीच्या व दोन भावांच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडणगे येथील चुलत बहीण सुवर्णा सदाशिव जौंदाळ (वय ५५) यांचाही रात्री पावणेनऊच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने मृत्यू झाला. वडील पांडुरंग तुकाराम देसाई व तिसरा भाऊ जलराज यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

दरम्यान, मालूबाई यांचा उजळाईवाडीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना काल सकाळी साडेनऊच्या सुमारास मृत्यू झाला. सागर व दीपक हेही कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. काल सकाळी साडेआठच्या सुमारास दीपक यांचा मृत्यू झाला. त्यांच्या शेजारीच सागर उपचार घेत होता. डोळ्यांदेखत भावाचा मृत्यू झाल्याने सागरला धक्का बसला. सकाळी साडेअकराच्या सुमारास त्याचाही मृत्यू झाला. 
देसाई कुटुंबीयांचा कळे येथे बांधकाम साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. गेल्या आठवड्यात त्यांची चुलती अनुसया यशवंत देसाई यांचे निधन झाले. त्यांच्या उत्तरकार्याला काही नातेवाईक आले होते. उत्तरकार्यानंतर त्यांच्यापैकी वडणगे येथील महिला कोरोना पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर देसाई कुटुंबातील सदस्यांनाही त्रास जाणवू लागला. त्यानंतर पांडुरंग तुकाराम देसाई, मालूबाई पांडुरंग देसाई हे पती-पत्नी व दीपक, सागर व जलराज (पन्हाळा पोलिस कर्मचारी) यांनी कोल्हापूर येथील खासगी दवाखान्यात तपासणी करून केली. 

हेही वाचा- 144 कलम लावून आंदोलन टळणार आहे का -

सर्व जण वेगवेगळ्या दवाखान्यांत उपचार घेत होते. त्यांनी स्वॅब दिलेला नव्हता. पांडुरंग देसाई, मालूबाई देसाई हे पती-पत्नी व त्यांची मुले दीपक, सागर व जलराज यांनाही त्रास जाणवत असल्याने एचआरटीसीच्या अहवालावर उपचार सुरू केले. उपचारादरम्यान, दीपकची प्रकृती काल बिघडली. सकाळी साडेआठच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्याचा भाऊ सागर शेजारच्या बेडवर असल्याने त्याने भाऊ दीपकचा मृत्यू झाल्याचे पाहिल्याने त्याचीही प्रकृती खालावत गेली व साडेअकराच्या सुमारास धक्‍क्‍याने त्याचा मृत्यू झाला. तत्पूर्वीच उजळाईवाडी येथील दवाखान्यात उपचार सुरू असलेली त्यांची आई मालूबाई यांचाही साडेनऊच्या सुमारास मृत्यू झाला. याबाबत कळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी विद्यानंद शिरोलीकर यांच्याकडे चौकशी केली असता मृतांचे अहवाल प्राप्त झाले नसल्याचे सांगितले.

कुटुंबातील सात जण पॉझिटिव्ह
तब्येतीचा त्रास जाणवत असल्याने त्यांच्या कुटुंबातील आणखी पंधरा जणांनी तपासणी केली असता त्यांच्यातील एका डॉक्‍टरसह सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर आठ जण निगेटिव्ह आले.

बाजारपेठेतील दुकाने बंद
पंचायत समितीने तालुक्‍यात ११ ते २० सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू पुकारला होता. कळे बाजारपेठेत सुरुवातीला प्रतिसाद मिळाला; पण गेल्या तीन दिवसांपासून दुकानदारांनी मुदत संपण्यापूर्वीच दुकाने उघडली. बाजारपेठेत गर्दी होती. आजच्या या घटनेने हबकून सर्व दुकानदारांनी पटापट दुकाने बंद केली.

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four members of the family died in the covid 19 case in kale kolhapur