esakal | म्हाळेवाडीच्या शेतकऱ्यावर कोल्ह्याचा हल्ला

बोलून बातमी शोधा

Fox Attack On A Farmer In Mhalewadi Kolhapur Marathi News

म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथील शेतकरी गणपती रामचंद्र पाटील यांच्यावर कोल्ह्याने हल्ला केल्याने ते जखमी झाले. सोमवारी सकाळी 8 वाजता ही घटना घडली.

म्हाळेवाडीच्या शेतकऱ्यावर कोल्ह्याचा हल्ला
sakal_logo
By
अशोक पाटील

कोवाड : म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथील शेतकरी गणपती रामचंद्र पाटील यांच्यावर कोल्ह्याने हल्ला केल्याने ते जखमी झाले. सोमवारी सकाळी 8 वाजता ही घटना घडली. जखमी पाटील यांच्यावर कोवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. महिन्याभरापूर्वी आणखी एका शेतकऱ्यावर कोल्ह्याने हल्ला केला होता. आजचा हा दुसरा हल्ला असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कोल्ह्याचा दिवसभर शोध घेतला पण तो सापडला नाही. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कोल्ह्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. 

गणपती पाटील हे नेहमी प्रमाणे वाडी नावाच्या शेतात गेले होते. शेतातील पाणंद रस्त्याने ते जात असताना अचानक कोल्ह्याने त्यांच्या पाठीमागून हल्ला केला. रस्त्यावर पडल्यानंतर कोल्ह्याने त्यांच्या पायाचे लचके तोडले. पाटील यांनी जोराचा प्रतिकार केल्यानंतर कोल्हा पळून गेला. जखमी अवस्थेत पाटील रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडले होते. दरम्यान, शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ त्यांना कोवाड येथील आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना गडहिंग्लजला हलविण्यात आले.

शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुंडलिक मर्णहोळकर यांच्यावरही कोल्ह्याने यापूर्वी हल्ला केला होता. गेल्या तीन ते चार महिन्यापासून परिसरात कोल्ह्याची दहशत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या अंगावर कोल्हा धावून आल्याच्या घटना आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांत भिती आहे. शेतकऱ्यांनी कोल्ह्याला शोधण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. सध्या उसाला पाणी देण्यासाठी शेतकरी शेतात आहेत. तसेच खते टाकण्यासह भांगलणीची कामे जोरात सुरू असल्याने शेतातून महिलांचाही वावर आहे. त्यामुळे वनविभागाने तात्काळ कोल्ह्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. 

वनविभागाने बंदोबस्त करावा
कोल्ह्याने गणपती पाटील यांच्यावर पाठीमागून हल्ला केल्याने त्यात ते जखमी झाले आहेत. कोल्हा पिसाळलेला असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच तो वारंवार शेतकऱ्यांच्यावर हल्ले करत आहे. यामुळे शेतकरी भयभित झाले आहेत. वनविभागाने कोल्ह्याचा शोध घेऊन त्याला पकडावे. 
- सी. ए. पाटील, सरपंच, म्हाळेवाडी 

संपादन - सचिन चराटी

kolhapur