पंचगंगा स्मशानभूमी कोविड़ मृतांवरच अंत्यसंस्कारासाठी राखीव 

युवराज पाटील
Wednesday, 5 August 2020

पंचगंगा स्मशानभूमीचे विस्तारीकरण व कोविडमुळे मृत्यू होणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता पंचगंगा स्मशानभूमीत जागा कमी पडू लागली आहे. त्यामुळे येथे केवळ कोविडने मृत्यू झालेल्या मृतदेहांवरच अंत्यसंस्कार होणार आहेत.

कोल्हापूर ः पंचगंगा स्मशानभूमीचे विस्तारीकरण सुरू असल्याने अंत्यसंस्कारास अडचण येत आहे. 

पंचगंगा स्मशानभूमीत कोविड़ मृतांवरच अंत्यसंस्कार 
--- 
जागा शिल्लक नसल्याने निर्णय, उर्वरित अंत्यविधी इतर स्मशानभूमीत होणार 
सकाळ वृत्तसेवा 
कोल्हापूर, ता. 4 ः पंचगंगा स्मशानभूमीचे विस्तारीकरण व कोविडमुळे मृत्यू होणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता पंचगंगा स्मशानभूमीत जागा कमी पडू लागली आहे. त्यामुळे येथे केवळ कोविडने मृत्यू झालेल्या मृतदेहांवरच अंत्यसंस्कार होणार आहेत. उर्वरित मृतदेहांसाठी केवळ सहा बेड राखीव असतील. त्यापेक्षा अधिक मृतदेह आल्यास कसबा बावडा, कदमवाडी, बापट कॅम्प आदी स्मशानभूमीत पाठविले जाईल. दरम्यान, अंत्यसंस्कारासाठी जागा नसल्याने सहा तासांच्या आत रक्षाविसर्जन करणे बंधनकारक केले आहे. 
कोरोना संसर्गाचा काळ, मृतांची वाढती संख्या, यातच स्मशानभूमीच्या विस्तारीकरणाचे काम सध्या सुरू आहे. दोन महिन्यांपासून स्मशानभूमीवर ताण पडला आहे. शहरात कोविडमुळे मृत्युमुखी पडणाऱ्या तसेच अन्य तालुक्‍यांतील कोविडने मृत्यू होणाऱ्यांवर येथेच अंत्यसंस्कार होतात. सध्या 14 बेड कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांसाठी राखीव आहेत. वीस बेडचे नव्याने बांधकाम सुरू आहे. अन्य मृतदेहांवरील अंत्यसंस्कारांसाठी कसेबसे दहा ते पंधरा बेड उपलब्ध आहेत. रोज किमान पंधरा ते वीस मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतात. एखादा मृतदेह अचानक आल्यावर त्याच्यावर अंत्यसंस्कार करायचे कुठे, असा प्रश्‍न निर्माण होतो. मृतदेहाची हेळसांड होऊ नये, तसेच नातेवाईकांना मनस्ताप होऊ नये, यासाठी कसबा बावडा, कदमवाडी अथवा बापट कॅम्प येथे मृतदेह नेण्याची विनंती करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे. 
शहरात सीपीआर, खासगी रुग्णालय येथे कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतात. त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र गरजेचे असते. शहर परिसर तसेच तालुक्‍याच्या ठिकाणाहून येणाऱ्या कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्काराचा ताण वाढत चालला आहे. आणखी किमान 15 दिवस वीस बेडच्या विस्तारीकरणाचे काम सुरू राहील. तोपर्यंत स्मशानभूमीवरील ताण वाढतच जाणार आहे. 

नातेवाईक न आल्यास रक्षा बाजूला ठेवतात 
अंत्यसंस्कारानंतर बुधवारी अथवा रविवारी रक्षाविसर्जन करण्याची प्रथा आहे. कॅलेंडरमधील तारीख आणि वार पाहूनच रक्षाविसर्जनाची तारीख निश्‍चित होते. आता मात्र कॅलेंडर पाहून रक्षाविसर्जन करण्याची वेळ राहिलेली नाही. कोविडमुळे नातेवाईकांचे नदीवर येणे बंद आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारानंतर सहा तासांच्या आता रक्षाविसर्जनाची विनंती केली जात आहे. संबंधिताचे नातेवाईक न आल्यास रक्षा बाजूला काढून मृतदेहासाठी जागा करून दिली जाते. 

पंचगंगा स्मशानभूमी 
एकूण बेड- 43 
कोविडसाठी राखीव बेड- 17 
विस्तारीकरण कामातील बेड- 20 
इतरांसाठी उपलब्ध बेड- 6 
... 

अन्य स्मशानभूमितील स्थीती

कसबा बावडा बेड- 14 
कदमवाडी बेड- 8 
बापट कॅम्प बेड- 6 

संपादन - यशवंत केसरकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Funeral on Kovid dead at Panchganga cemetery