esakal | गडहिंग्लजला तपासणी शिबिरातून आले धक्कादायक निष्कर्ष
sakal

बोलून बातमी शोधा

In Gadhinglaj Came From The Investigation Camp With Shocking Findings Kolhapur Marathi News

गेल्या महिन्याभरात गडहिंग्लज शहरात दोन तरुण उद्योजकांचे हृदयविकाराने निधन झाले. यामुळे शहरात या आजाराचा धसका घेतला आहे. पूर्वी पन्नाशीनंतरच रक्तदाब, मधुमेहाचे निदान व्हायचे; परंतु, सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात पस्तीशीनंतरच्या तरुणाईमध्ये मानसिक तणाव वाढत चालला आहे. याचाच परिणाम शरिरात रक्तदाब व मधुमेह (शुगर) वाढण्यावर होत आहे.

गडहिंग्लजला तपासणी शिबिरातून आले धक्कादायक निष्कर्ष

sakal_logo
By
अजित माद्याळे

गडहिंग्लज : शहरातील 35 ते 50 वयोगटातील स्त्री-पुरुषांसाठी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात 70 जणांना रक्तदाब (बी.पी.) असल्याचे निदान झाल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. त्यांना डॉक्‍टरांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेष करून तरुणाईमध्ये आढळणारा रक्तदाब शहराच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे. 

गेल्या महिन्याभरात शहरात दोन तरुण उद्योजकांचे हृदयविकाराने निधन झाले. यामुळे शहरात या आजाराचा धसका घेतला आहे. पूर्वी पन्नाशीनंतरच रक्तदाब, मधुमेहाचे निदान व्हायचे; परंतु, सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात पस्तीशीनंतरच्या तरुणाईमध्ये मानसिक तणाव वाढत चालला आहे. याचाच परिणाम शरिरात रक्तदाब व मधुमेह (शुगर) वाढण्यावर होत आहे. 

या पार्श्‍वभूमीवर आम्ही बंटीदा प्रेमी मंडळ, गांधीनगर युथ सर्कल आणि मिरजेच्या सेवासदन लाईफ लाईन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे नगरसेवक महेश कोरी यांच्या पुढाकाराने काल (ता. 28) येथे मोफत आरोग्य शिबिर झाले. शिबिरात विशेष करून रक्तदाब, मधुमेह, ईसीजी तपासणी करण्यात आली. यात 450 जणांनी आपल्याला काय झालंय याची तपासणी करून घेतली.

रक्तदाब, मधुमेह आणि ईसीजी तपासणी झाल्यानंतर 70 जणांना बीपीचे निदान झाल्याचा निष्कर्ष पुढे आला. ज्यांना रक्तदाबाचे निदान झाले आहे, त्यांनी त्याची कधीच कल्पनाही केलेली नव्हती. यामुळे तपासणी शिबिराद्वारे झालेले हे निदान त्यांना वेळेत औषधोपचार सुरू करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

रक्तदाबाचे निदान झाल्यानंतर संबंधितांना डॉक्‍टरांच्या सल्ल्याने वेळीच औषधोपचार सुरू ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनेकांना मधुमेहाचेही निदान झाल्याचा निष्कर्ष पुढे आल्यानंतर त्यांना मात्र पुन्हा सकाळी उपाशीपोटी आणि जेवणानंतरच्या दोन तासांनी मधुमेह तपासणीचा सल्ला देण्यात आला आहे. 

शिबिरातील एकूण सहभाग .... 450 
ईसीजी काढलेले नागरिक ......270 
रक्तदाबाचे निदान झालेले ...... 70 
इको करण्याचा सल्ला देण्यात आलेले .... 27 
अँजिओग्राफीची गरज व्यक्त केलेले ....14