Gadhinglaj Factory News Kolhapur Marathi News
Gadhinglaj Factory News Kolhapur Marathi News

गडहिंग्लज कारखाना निवडणूकीच्या तोंडावरच हंगामासाठी कसरतीची चिन्हे

गडहिंग्लज : दहा वर्षे करारातील दोन वर्षे शिल्लक असतानाच ब्रिस्क फॅसिलिटीज कंपनीने आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका साखर कारखान्याला (गोडसाखर) रामराम करण्याचे ठरविले आहे. येत्या मार्च महिन्यात कारखान्यातील विद्यमान सभागृहाची मुदत संपत असून कंपनीच्या या निर्णयाने ऐन निवडणुकीच्या तोंडावरच "गोडसाखर' वाऱ्यावर पडण्याचे संकेत मिळत आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेला पुनरुच्चार खरा ठरलाच तर भविष्यात कारखान्याची चाके फिरवण्यासाठी तारेवरची कसरत आहे. 

कंपनी सोडून जाण्याचा मुद्दा येणाऱ्या कारखाना निवडणुकीत गाजणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ असली तरी हा मुद्दा कोणाला तारणार आणि कोणाला मारक ठरणार, हे आताच सांगणे तसे कठीण आहे. थकीत देणींसाठी निवृत्त कामगारांच्या आंदोलनाला महिना उलटला आहे. अजूनही हे आंदोलन सुरुच आहे.

एकीकडील हे आंदोलन, त्यानिमित्ताने कारखाना आणि ब्रिस्क कंपनीकडून झालेली उलट-सुलट वक्तव्ये, निवृत्त कामगारांचे नेते शिवाजी खोत यांनी कंपनी व कारखाना व्यवस्थापनावर केलेले आरोप आणि आंदोलन काळातच मंत्री मुश्रीफ यांनी गोडसाखरला ब्रिस्क रामराम करणार असल्याचे केलेले वक्तव्य हे मुद्दे आगामी निवडणुकीभोवती पिंगा घालण्याची शक्‍यता वर्तविली जाते. 

ऐन निवडणुकीच्या तोंडावर कंपनीने घेतलेल्या या निर्णयाने गोडसाखर वाऱ्यावर पडण्याची धोक्‍याची घंटा कामगारांसह ऊस उत्पादकांनाही मिळत आहे. स्वबळावर चालवू शकेल इतका कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे सांगण्यात येते. यामुळे कारखाना चालवण्यासाठी पुन्हा एखादी कंपनीच शोधावी लागणार आहे.

निवडणुकीनंतरच्या संचालक मंडळाला ही कसरत करावी लागण्याची दाट शक्‍यता आहे. मंत्री मुश्रीफ यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने गोडसाखरला वाऱ्यावर न सोडता कारखाना सुरळीत कसा चालेल, यासाठी सहकार्य करण्याची दिलेली ग्वाही काही अंशी दिलासा देणारी असली तरी त्यासाठी आगामी निवडणुकीनंतर कारखान्यात कसे चित्र राहणार, याची झालरही महत्वपूर्ण ठरणारी आहे. 

"आजरा'ची शक्‍यता धूसर... 
गोडसाखर सोडल्यानंतर ब्रिस्क कंपनी आजरा कारखाना चालवण्यास घेणार असल्याची चर्चा आहे. परंतु, त्यात तथ्य नसल्याचे खात्रीलायक समजते. आजरा सुरु करण्यासाठी मंत्री एकनाथ शिंदे व उदय सामंत यांच्याकडे व्यवस्थापनाचा पाठपुरावा सुरू असल्याचे कळते. त्यांनी मदतीची ग्वाही दिल्याने ब्रिस्क "आजरा' चालवेल, याची शक्‍यता धूसर असल्याचे बोलले जाते. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com