मंजूर 10 कोटींची गडहिंग्लजला प्रतीक्षा

अजित माद्याळे
Thursday, 22 October 2020

गडहिंग्लज शहरासह हद्दवाढ क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी गडहिंग्लज पालिकेला वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत दहा कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

गडहिंग्लज : शहरासह हद्दवाढ क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी गडहिंग्लज पालिकेला वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत दहा कोटींचा निधी मंजूर झाला आहे. प्रस्तावित कामांना जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. परंतु, मंजूर निधी अद्याप पालिकेला मिळाला नसून तो तत्काळ द्यावा, असे साकडे नगराध्यक्ष स्वाती कोरी यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना घातले आहे. 

दरम्यान, हा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्‍वासन मुश्रीफ यांनी या वेळी दिले. विविध विकासकामांसाठीच्या अनुदानसंदर्भात कोरी यांनी मंत्रालयात मंत्री मुश्रीफ यांची भेट घेऊन निवेदन दिले. निधी मिळण्यासाठी शिफारस करण्याची मागणीही कोरी यांनी या वेळी केली. दीड वर्षापूर्वी शहराची हद्दवाढ झाली आहे. त्यानंतर नव्या प्रभागाची निवडणूक होऊन नगरसेवकही निवडून आले.

दरम्यान, या हद्दवाढीच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मूळ शहरातील विकासकामांसाठीही पाच कोटी मंजुरीचे पत्र आले. यामध्ये बहुतांश रस्ते आणि गटारींच्या कामांचा समावेश आहे, मात्र अद्याप हा मंजूर निधी पालिकेला मिळालेला नाही. मंजूर असलेला दहा कोटींचा निधी मिळाल्यास शहरवासीयांसह हद्दवाढीतील नागरिकांची गैरसोय दूर होणार असल्याचे कोरी यांनी या वेळी सांगितले. 

तसेच विशेष रस्ता योजनेतून 2018-19 साठी एक कोटीचे अनुदान मंजूर झाले आहे. परंतु, हा निधीही अद्याप मिळाला नसून त्यासाठीही शिफारस करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. प्रारूप विकास योजना आराखड्यात आरक्षण क्र. 20 मध्ये सांस्कृतिक केंद्र व वाचनालयासाठी 8 कोटी 74 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. या निधीसह विरोधी पक्षनेते हारुण सय्यद यांनी सुचवलेल्या विकासकामांसाठी दीड कोटीच्या निधीची गरज असून हा निधीही मिळावा, अशी मागणी सौ. कोरी यांनी केली आहे. यावेळी सागर पाटील व विनोद बिलावर उपस्थित होते. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gadhinglaj Municipality Waiting for 10 crore to Kolhapur Marathi News