
थकीत देणी मिळविण्यासाठी सातव्या दिवशीही ठिय्या
गडहिंग्लज (कोल्हापूर) : सेवा काळातील ग्रॅच्युइटी, वेतनवाढीतील फरक, फायनल पेमेंट आदी थकीत देणी द्यावीत या मागण्यांसाठी गोडसाखरच्या निवृत्त कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. प्रांत कार्यालयासमोर 14 जानेवारीपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आजपासून त्यांनी दुसऱ्या टप्प्याला सुरवात केली. सकाळी साडेदहाला सर्व कामगार प्रांत कार्यालयासमोर जमले. त्यानंतर अंगावरील शर्ट व बनियन काढत अर्धनग्न झाले. त्याच अवस्थेत प्रांत कार्यालयापासून मोर्चाला सुरवात झाली.
थकीत देणी मिळविण्यासाठी अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याचे (गोडसाखर) निवृत्त कर्मचारी आज अर्धनग्न झाले. त्याच अवस्थेत त्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरुन मोर्चा काढला. अर्धनग्न कामगार, हलगी-कैताळाचा दणदणाट आणि जोरदार घोषणांनी शहरवासीयांचे लक्ष वेधले. निवृत्त कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी सलग सातव्या दिवशी प्रांत कार्यालयासमोर ठिय्या मारला.
हेही वाचा- मानवी वस्तीनजीक वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे
लक्ष्मी रोड, नेहरु चौक, बाजारपेठ, वीरशैव चौक, मुख्य रस्ता, कडगाव रोड, तहसील कार्यालय, कचेरी रोडवरुन मोर्चा पुन्हा प्रांत कार्यालयावर आला. हलगी-कैताळाचा दणदणाट आणि कामगार एकजुटीचा विजय असो..., कोण म्हणतय देत नाही..., 17 कोटी रुपये थकीत देणी मिळालेच पाहिजे... आदी घोषणांनी मोर्चा मार्गावरील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
संपादन- अर्चना बनगे