गडहिंग्लजचे कोविड सेंटर झाले बंद

अवधूत पाटील
Wednesday, 13 January 2021

काही महिन्यांपूर्वी हाहाकार माजविलेल्या कोरोनाचा संसर्ग जवळपास थांबला आहे. तालुक्‍यात आता रुग्णच नसल्याने येथील कोविड केअर सेंटर बंद केले आहे.

गडहिंग्लज : काही महिन्यांपूर्वी हाहाकार माजविलेल्या कोरोनाचा संसर्ग जवळपास थांबला आहे. तालुक्‍यात आता रुग्णच नसल्याने येथील कोविड केअर सेंटर बंद केले आहे. शेंद्री मार्गावर उभारलेल्या या सेंटरने गेली साडेआठ महिने अविरतपणे भार वाहिला. कोरोनाचा संसर्ग झालेल्या 767 रुग्णांवर उपचार केले. त्यासाठी 71 वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी कार्यरत होते. 

मार्च महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन सुरवातीला येथील उपजिल्हा रुग्णालयात काही बेड आरक्षित ठेवले होते. मात्र, झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गामुळे येथील शेंद्री रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात कोविड केअर सेंटर उभारले. 1 एप्रिल 2020 रोजी या सेंटरची सुरवात झाली. सुरवातीला आजरा व चंदगड तालुक्‍यात कोविड केअर सेंटर नसल्याने तेथील रुग्णही दाखल होत होते. आरोग्य विभागाकडील कर्मचाऱ्यांवर या सेंटरची जबाबदारी सोपविली होती. 

दरम्यान, संसर्ग वाढल्याने रुग्णसंख्याही वाढत गेली. त्यामुळे आरोग्य विभागाकडून कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. एकूण 71 कर्मचारी कामकाज पाहत होते. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, परिचरांचा समावेश होता. साडेआठ महिन्यांच्या कालावधीत 767 रुग्णांवर उपचार केले. तालुक्‍यात एकूण 1491 रुग्ण आढळले आहेत. यातील 50 टक्के रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये उपचार मिळाले आहेत. 

गेल्या दीड-दोन महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. संसर्ग रोखण्यात यश आल्याने नवे रुग्ण सापडणे बंद झाले आहे. गेल्या दहा दिवसांपासून एकही नवा रुग्ण नसल्याने आणि जुने रुग्णही उपचार घेऊन बरे झाले असल्याने कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी (ता.11) हे सेंटर बंद करण्यात आले. 

12,377 जणांचे स्वॅब... 
कोविड केअर सेंटरमध्येच संशयित रुग्णांच्या चाचणीसाठी स्वॅब घेण्याची व्यवस्था केली होती. त्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त केले होते. सेंटर सुरू झाल्यापासून ते सोमवारपर्यंत (ता.11) एकूण 12 हजार 377 जणांचे स्वॅब घेतले आहेत. यातील एक हजार 491 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gadhinglaj's Kovid Center Closed Kolhapur Marathi News