गणेशोत्सव सण मोठा, पण यंदा साजरा करू साधा... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सवात कोरोना प्रबोधन, जनजागृतीवर भर द्यावा, गोरगरिबांना मदत करावी, रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. 

कोल्हापूर : शहरातील सार्वजनिक मंडळांची वेगळीच परंपरा आहे, सामाजिक उपक्रम आणि प्रबोधनाचा वारसा या मंडळांना आहे, यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सवात कोरोना प्रबोधन, जनजागृतीवर भर द्यावा, गोरगरिबांना मदत करावी, रक्तदान शिबिरांचे आयोजन करून साधेपणाने; पण उत्सवाची सामाजिक उंची वाढेल, अशा पद्धतीने उपक्रम राबवावेत, असे आवाहन कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे. "सकाळ'ने याबाबत आज त्यांना विचारणा केली असता, त्यांनी ही मते व्यक्त केली. 

आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, कोल्हापूरची सार्वजनिक मंडळे नेहमीच सामाजिक भान ठेवून काम करतात. गतवर्षी जिल्ह्यावर महापुराचे संकट आले होते. या संकटाच्या काळात सार्वजनिक मंडळांनी पुढाकार घेतला. मदतकार्य केले. महापुराने बाधित झालेल्यांना मदतीचा हात दिला. त्यांचे हे काम कौतुकास्पदच आहे. गेल्या वर्षभराहून अधिक काळ महापालिका दर रविवारी स्वच्छता मोहीम आयोजित करते. या मोहिमेतही मंडळांनी उर्त्स्फूतपणे सहभाग घेतला आहे. त्यामुळे कोल्हापुरातील सार्वजनिक मंडळे ही नेहमीच सामाजिक भान कायम ठेवून काम करतात. यंदाच्या गणेशोत्सवावरही कोरोना आजाराचे सावट आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. लॉकडाउन उठत असले तरी देखील खरी जबाबदारी नागरिकांची आहे. गणेशोत्सव मोठा सण आहे; पण यंदा काही मर्यादा सर्वांनी पाळणे गरजेचे आहे. राज्य शासन याबाबतीत मार्गदर्शक सूचना देईल; पण महापालिकेचा आयुक्त म्हणून मी सार्वजनिक मंडळांना आवाहन करतो की, त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम गणेशोत्सवात राबवावेत. रक्तदान शिबिराचे आयोजन करावे. कोरोना आजाराविषयी जनजागृती करावी. 
ज्या मंडळांची चांगली क्षमता आहे. त्यांनी समाजातील गरजू, गरिबांना मदतीचा हात द्यावा. 

गर्दी टाळा, सोशल डिस्टन्सिंग पाळा 
गणेशोत्सवातही गर्दी टाळणे आवश्‍यक आहे. एका ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. गणेशोत्सवाच्या काळात जनतेवर या नियमांची माहिती सातत्याने देऊन प्रबोधन करण्यावर सार्वजनिक मंडळांनी भर दिला, तर गणेशोत्सवाचा प्रबोधन आणि जनजागृती हा उद्देशही सफल होणार आहे. 

आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणतात... 
* कोल्हापूरच्या मंडळांचे सामाजिक भान ठेवून काम 
*समाजातील गरीब, गरजूंना मदतीचा हात द्या 
* सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा 
*मास्क वापरणे बंधनकारक करा 
*सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav let's celebrate small this year