व्हिडीओ : कोल्हापुरातील गणेशोत्सव मंडळे कोरोनाविरोधातील लढाईला देणार बळ ; 'सकाळ'चा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

'सकाळ'च्या पुढाकाराने तालीम संस्था, गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची मते व सूचना 'सिटीझन एडिटर' उपक्रमातून जाणून घेण्यात आल्या.

कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जाणार आहे. सुरक्षिततेचे सर्व नियम पाळले जातील. गर्दीतून संसर्ग वाढू नये, यासाठी मिरवणुका आणि देखावे यंदा होणार नाहीत. एकीकडे उत्सवातून संसर्ग कमी होण्यासाठी प्रयत्न करतानाच कोरोनाग्रस्त किंवा गरजूंसह शासकीय यंत्रणांना आवश्‍यक मदतीसाठी पुढाकार घेऊन या लढाईला आणखी बळ दिले जाईल, अशी ग्वाही आज विविध गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

यंदाच्या उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्याशिवाय आता समूह संसर्गाचा धोकाही वाढू लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर 'सकाळ'च्या पुढाकाराने तालीम संस्था, गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची मते व सूचना 'सिटीझन एडिटर' उपक्रमातून जाणून घेण्यात आल्या. बहुतांश सर्वच मंडळे यंदा साधेपणाने उत्सव साजरा करण्यासाठी आग्रही असून प्रशासनाने मात्र नियमावलीच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचा दबाव मंडळावर आणू नये. त्यासाठी 'सकाळ'ने समन्वयाची भूमिका पार पाडावी, अशा सूचनाही यावेळी मांडल्या.

वाचा - लक्षणे नाहीत, रेड झोनमधून नाही, तरीही संस्थात्मक क्वारंटाईन...

तटाकडील तालमीचे अध्यक्ष महेश जाधव, फिरंगाई तालमीचे अध्यक्ष रविकिरण इंगवले, पाटाकडील तालमीचे उपाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, व्हीनस कॉर्नर मित्र मंडळाचे अध्यक्ष शशी बिडकर, शिवाजी चौक तरुण मंडळाचे उपाध्यक्ष सुहास भेंडे, प्रसाद वळंजू, खंडोबा तालमीचे अध्यक्ष प्रल्हाद पोवार, प्रॅक्‍टिस क्‍लबचे अध्यक्ष नितीन सावंत, दिलबहार तालमीचे पद्माकर कापसे, संयुक्त राजारामपुरीचे संजय जाधव, सुबराव गवळी तालमीचे रमेश पोवार आदी उपस्थित होते.

सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार म्हणाले, "कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उत्सव साजरा व्हायलाच हवा. पण, तो अधिक सुरक्षित आणि त्यातून कोरोनाविरोधातील लढाईसाठी बळ देण्याची भूमिका घेणे महत्त्वाचे आहे. कारण उत्सवापेक्षाही माणसांचा जीव अधिक महत्त्वाचा असतो. कोल्हापुरातील गणेशोत्सव मंडळांनी नेहमीच अशा आपत्कालीन परिस्थितीत विधायकता जपत राज्याला आदर्श दिला असून, यंदाही ही परंपरा कायम राहील.''

वाचा - गावे समृद्ध करा, महाराष्ट्र आपोआपच स्वच्छ, समृद्ध बनेल

'सकाळ'चे निवासी संपादक निखिल पंडितराव यांनी स्वागत केले. ते म्हणाले, "यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उत्सवाबाबत संभ्रमावस्था आहे. मात्र, तरीही विधायक व साधेपणाने उत्सवासाठी शहर आणि परिसरातील गणेशोत्सव मंडळांनीच पुढाकार घेतला आहे. येत्या काळात गणेशोत्सव मंडळे आणि प्रशासनामध्ये समन्वयाची भूमिका "सकाळ' निश्‍चित पार पाडेल.'' दरम्यान, मुख्य बातमीदार निवास चौगले यांनी आभार मानले.

शाळांबाबत पुढाकार घ्या...

कोरोनामुळे यंदा शाळा कधी सुरू होणार, याबाबत संभ्रमावस्था आहे. रोज नवनवीन फतवे येतात. राज्य शासन एक सांगते आणि स्थानिक प्रशासनाची एक भूमिका असते. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर "सकाळ'ने पुढाकार घेऊन तज्ज्ञांशी चर्चा घडवून आणावी आणि त्यातून योग्य त्या उपाययोजना सुचवाव्यात, अशी मागणीही झाली. अंबाबाई मंदिर आणि धार्मिक स्थळे खुली करण्याबाबतही लवकरात लवकर निर्णय व्हावा, अशाही सुचना यावेळी मांडण्यात आल्या.

त्र्यंबोली यात्रा मिरवणुका नाहीच...

त्र्यंबोली यात्रांना आता पेठांपेठांत प्रारंभ होईल. मात्र, यंदा देवीला पाणी वाहण्यासाठी निघणाऱ्या भव्य मिरवणुका न काढण्याचा निर्णयही यावेळी झाला. एकूणच परिस्थिती पाहता केवळ तालमीत मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत विविध धार्मिक विधी केले जाणार असल्याचेही यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav Mandals in Kolhapur to give strength to fight against Corona Sakal initiative