चंदगड तालुक्यात गोवा बनावटीची दारु जप्त

सुनील कोंडुसकर
Thursday, 26 November 2020

करंजगाव (ता. चंदगड) येथील मारुती सटुप्पा आवडण यांच्या शेतातील गोठ्यामध्ये गोवा बनावटीच्या दारुचा साठ्यावर पोलिसांनी छापा मारला.

चंदगड : करंजगाव (ता. चंदगड) येथील मारुती सटुप्पा आवडण यांच्या शेतातील गोठ्यामध्ये गोवा बनावटीच्या दारुचा साठ्यावर पोलिसांनी छापा मारला. 2 लाख 18 हजार 784 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या आदेशानुसार आज रात्री आठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. 

येथील पोलिस ठाण्याकडील कॉंस्टेबल वैभव गवळी यांना करंजगाव येथील आवडण यांच्या शेतातील गोठ्यात दारुचा साठा केला असल्याची माहिती मिळाली. वरीष्टांशी चर्चा केल्यानंतर छापा मारण्याचे आदेश मिळाले. 

उपनिरीक्षक दिलीप पवार, प्रभारी अधिकारी अविनाश माने यांच्या मार्गदर्शनाने हावलदार सुतार, आर. पी. किल्लेदार, गवळी, सुतार खासगी वाहनाने करंजगाव येथे पोहचले. गोठ्याजवळ जाऊन त्यांनी स्थानिक व्यक्तीकडून आवडण यांच्या गोठ्याची खात्री केली. पोलीस पाटलांना बोलावून गोठा मालक आवडण याला बोलावणे पाठवले. परंतु ते आले नाहीत.

पोलिसांनी तिथेच चावीचा शोध घेतला असला तुळईला चावी आढळली. कुलूप उघडून तपासणी केली असता महाराष्ट्राचा कर चुकवून आणलेली गोवा बनावटीची दारु सापडली. यामध्ये गोल्डन आईस व्हीस्कीचे 39 बॉक्‍स, रियल्स थर्स्टी ट्रॅव्हलर व्हीस्कीचा एक बॉक्‍स आढळला. त्यीाच किंमत 2 लाख 18 हजार 784 रुपये होते. या प्रकरणी मारुती आवडण याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. 

 

संपादन - सचिन चराटी

 

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Goa-made liquor seized in Chandgad taluka Kolhapur Marathi News