यंत्रणेकडून पास वाटपाचा "खेळ मांडला'

लुमाकांत नलवडे
मंगळवार, 7 एप्रिल 2020

माल वाहतुकीसाठी परवाना घेण्याची गरज नसल्याचे पोलिस महासंचालकांनी स्पष्ट केले आहे, तरीही आरटीओ कार्यालयातून "ऑनलाईन' पास घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे; मात्र पोलिस मुख्यालयातील सायबर सेलने अशा वाहनांना पासची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे.

कोल्हापूर :  माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना संचारबंदीत पुन्हा परवाना घेण्याची गरज नाही, तरीही सरकारी अधिकारी वेळ वाया घालवून अशा पद्धतीचे पास वितरीत करत आहेत. कृषी विभागाकडून 785 तर बाजार समितीकडून 125 हून अधिक पास दिले आहेत. अद्यापही पास देण्याची प्रक्रिया सुरूच आहे. काही अधिकाऱ्यांनी व्हॉटस्‌ ऍपद्वारे पास देऊन वाहवाह मिळवली आहे. 

प्रत्यक्षात माल वाहतुकीसाठी परवाना घेण्याची गरज नसल्याचे पोलिस महासंचालकांनी स्पष्ट केले आहे, तरीही आरटीओ कार्यालयातून "ऑनलाईन' पास घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे; मात्र पोलिस मुख्यालयातील सायबर सेलने अशा वाहनांना पासची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोना विषाणू आणि संचारबंदीच्या नावाखाली सरकारी यंत्रणेने पासचा "खेळ मांडला' आहे. 

अनेक वाहनांतून कृषी उत्पादनांची वाहतूक केली जाते. या वाहनांना परवान्याची गरज नाही, तरीही कृषी विभागातूनत तब्बल 785 माल वाहतुकीसाठी परवाने दिले आहेत. व्हॉटस्‌ ऍपवर परवाने दिले जातात. बाजार समितीबाबत जिल्हा उपनिबंधक व समन्वयक अमर शिंदे यांना विचारले असता त्यांनी बाजार समितीतून सव्वाशेहून अधिक पास दिले आहेत. अद्याप पास देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. जिल्हा प्रशासनाकडून माल वाहतुकीसाठी आरटीओकडून "ऑनलाईन' परवाना घेण्याचे आवाहन केले आहे. त्याच्या लिंक दिल्या आहेत. माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना परवान्याची गरज नाही, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिससुद्धा सांगत आहेत, तरीही सरकारी यंत्रणा माल वाहतूकदारांना याची कल्पना देत नाहीत. 

सायबर सेल अपडेट 
सायबर सेलमध्ये ई-पासची सुविधा आहे. वाहतूकदारांना परवान्याची गरज नसल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट केले आहे. आजपर्यंत त्यांनी 7 हजार 234 अर्ज नाकारले आहेत. केवळ 627 अर्ज मंजूर केले आहेत. 38 पासधारकांना पास मंजूर झाले आहेत, मात्र त्यांची आजअखेर मुदत संपलल्याचे सायबर सेलचे प्रमुख संजय मोरे यांनी सांगितले. 

जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक करताना पोलिसांनी पासची मागणी केल्यास त्यांच्या विरोधात स्थानिक पोलिस ठाणे, शंभर क्रमाकांवर, पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करावी. जीवनावश्‍यक वस्तूंच्या वाहतुकीला परवान्याची गरज नाही, मात्र माल वाहतूक वाहनांतून प्रवासी वाहतूक केल्यास चालकांवर गुन्हा दाखल केला जाईल. 
- डॉ. सुहास वारके ः विशेष पोलिस महानिरीक्षक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: government permission letter