ग्रामपंचायतींत बिनविरोध सदस्य निवडीसाठी भाजपचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

भाजपच्या स्वप्नाला काँग्रेस आणि म. ए. समितीकडून खिंडार पाडण्याची शक्‍यता आहे.

बेळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमध्ये बिनविरोध निवडणुकीची तयारी करत भाजपने एकहाती सत्ता मिळविल्याने भाजपचा उत्साहही द्विगुणित झाला आहे. भाजपने ग्रामपंचायत निवडणुकीतही अनेक ग्रामपंचायतींत बिनविरोध सदस्य निवडीवर भर दिला आहे. बेळगाव ग्रामीण मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामीणमध्ये काँग्रेसचे प्राबल्य वाढले असून ते कमी करण्याचाच भाजपचा प्रयत्न आहे. परंतु, भाजपच्या स्वप्नाला काँग्रेस आणि म. ए. समितीकडून खिंडार पाडण्याची शक्‍यता आहे.

हेही वाचा -  हत्तीचा धुडगूसच: शेतकऱ्याच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली; गायीवर हल्ल्याचा प्रयत्न

ग्रामपंचायत निवडणुका पक्षीय चिन्हांवर होत नाहीत, तरीही ग्रामपंचायत निवडणूक हीच राजकीय पक्षांची विजयाची पहिली पायरी असते. पुढील वर्षी मे महिन्यात तालुका आणि जिल्हा पंचायत निवडणुका होणार आहेत. ग्रामपंचायतीमध्ये जो पक्ष आपले समर्थक अधिक निवडून आणेल, तोच पक्ष तालुका आणि जिल्हा पंचायतीमध्येही निर्विवाद सत्ता स्थापित करेल, अशी गोळाबेरीज घातली जात आहे. सध्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर रिक्त जागेसाठी लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. अंगडी कुटुंबीयांनाच उमेदवारी द्यावी, अशी अनेकांची मागणी आहे.

अंगडी कुटुंबाला उमेदवारी न मिळाल्यास त्याठिकाणी माजी खासदार तसेच मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश कत्ती इच्छुक आहेत. माजी आमदार संजय पाटील यांचेही नाव घेतले जात आहे. मात्र, भाजपकडून कोणी जरी बसले, तरी त्यांच्या विजयासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागतील. पुढील सर्व निवडणुकांसाठी ग्रामपंचायत निवडणूकच रंगीत तालीम 
ठरणार आहे. 

ग्रामीण भागात जरी भाजपकडून बिनविरोधाची तयारी केली होत असली तरी त्याला म. ए. समिती व काँग्रेसची टक्कर असेल. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी हेच पुढील खासदार, अशी सोशल मीडियावरुन जाहिरातबाजी सुरू आहे. त्यामुळे या स्पर्धेत काँग्रेसकडून त्यांचे नावही येऊ लागले आहे. काँग्रेसला भाजपच्या उमेदवाराच्या तोडीचा उमेदवार हवा आहे. जिल्ह्यात भाजप प्रबळ आहे, पण ग्रामीणमध्ये समिती आणि काँग्रेस आघाडीवर आहेत. त्यामुळे ग्रामीण मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. 

हेही वाचा - बेळगावात टीईटीत 2 लाख परीक्षार्थींपैकी फक्त 8 हजार पास

समिती, काँग्रेसचे आव्हान

बेळगाव ग्रामीणमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत जितके भाजपचे समर्थक निवडून येतील, त्यावर माजी आमदार संजय पाटील यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. जिल्हा पंचायत, तालुका पंचायत या दोन्ही ठिकाणीही ग्रामीणमध्ये म. ए. समिती व काँग्रेस आघाडीवर आहे. जुनी मरगळ दूर करून पुन्हा समितीच्या झेंड्याखाली मराठी भाषिक उमेदवार समितीच्या बळकटीसाठी एकत्र येत आहेत.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat election in belgium the BJP try unopposed election in village area belgaum