
गावागावांत तरुणाईने थोपटले दंड
प्रस्थापितांविरोधात बंड, गटनेत्यांची झाली कोंडी
गडहिंग्लज (कोल्हापूर) : ग्रामपंचायत निवडणुकीतील माघारीसाठी मनधरणी सुरू असून पॅनेलची रचना अंतिम टप्प्यात आहे. यात अर्ज भरणाऱ्यांत तरुणांची संख्या लक्षणीय आहे. परिणामी, तरुणाईने प्रस्थापितांविरोधात दंडच थोपटले आहेत. त्यामुळे गट नेत्यांची कोंडी झाली आहे. तिकीट द्या, अन्यथा अपक्ष लढणार, अशा तरुणांच्या भूमिकेने मातब्बरांनी धसका घेतला आहे. या नव्या चेहऱ्यांना मिळणारा प्रतिसादही लक्षणीय असल्याने पॅनेल कारभाऱ्यांची गोची झाली आहे.
गडहिंग्लज तालुक्यातील ५० गावांवर हुकूमत राखण्यासाठी नेत्यांनी कंबर कसली आहे. ग्रामपंचायतीवर काही ठराविक कुटुंबाची मक्तेदारी राहिली आहे. अशा प्रस्थापितांविरोधात नाराजीचा सूर आहे. खास करून तरुणांनी यासाठी थेट शड्डू ठोकला आहे. विविध तरुण मंडळे, क्रीडामंडळे, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, शिवजयंती या माध्यमातून तरुणांनी एकजूट राखली आहे. यातून नव्या नेतृत्वाला चालना मिळत आहे. सत्तेशिवाय मदतीला धावणाऱ्या या तरुणांना ग्रामस्थांतर्फेच ग्रामपंचायतीच्या आखाड्यात उतरण्याचे आवतन दिल्यानेच मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. तालुक्यातील तेगीनहाळ या गावात तरुणाईच्या पुढाकारानेच निवडणूक बिनविरोधच्या उंबरठ्यावर आहे. हेब्बाळ, कसबा नूलमध्ये तर तरुणांनी स्वतंत्र आघाडीने रणशिंग फुंकले आहे.
हेही वाचा- Video: कोल्हापुरात आहे अस एक गाव जिथे महिलांनी आणली शांतता आणि आरोग्याची क्रांती! -
समाज माध्यमांच्या जोरावर या तरुणांनी चांगले वातारवण केले आहे. खास करून निस्वार्थीपणाने मदतीचा स्वभावामुळे अशा तरुणांची गावांत मोठी क्रेझ आहे. कमी जास्त प्रमाणात जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायत निवडणूक होणाऱ्या गावांत हेच चित्र आहे. मुख्यतः तालुकास्तरीय नेत्यांच्या बालेकिल्ल्यात तरुणाईने अर्ज १ भरून रंग भरला आहे. परिणामी, मनधरणीसाठी धावाधाव सुरू आहे.
युवाशक्ती निर्णायक?
सर्वच आघांड्याकडून विशेषतः युवा उमेदवार, मतदारावर लक्ष ठेवले जात आहे. युवा मतदांराची वाढलेली संख्या हे त्यामागील रहस्य आहे. सरासरी प्रत्येक तालुक्यात १० हजारांनी नवमतदारांची संख्या वाढली आहे. पूर्वी केवळ प्रचारासाठी वापरली जाणारी युवाशक्ती मोठ्या गावात निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. तरुण मंडळे, क्रीडा मंडळे अशा युवकांचे गट आपल्याकडे कसे राहतील यासाठी व्यूहरचना करत एकवेळ ज्येष्ठाला थांबवून तरुण कार्यकर्त्याला बळ देण्याचे डावपेच कारभाऱ्यांनी आखले आहेत.
संपादन-अर्चना बनगे