Gram Panchayat Results : कागल तालुक्यात महाविकास आघाडीची बाजी

gram panchayat result 2021 maharashtra kolhapur kagal taluka
gram panchayat result 2021 maharashtra kolhapur kagal taluka

कागल/म्हाकवे  : कागल तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 30 ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली. तर आठ ग्रामपंचायतीमध्ये विरोधकांचा धुव्वा उडाला. पिंपळगाव बुद्रुक, बानगे, हळदवडे, करंजीवणे, म्हाकवे या पाच गावात सत्तांतर झाले. विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. 

पिंपळगाव बुद्रुक या ठिकाणी चाळीस वर्षांच्या राजेंच्या सत्तेला खिंडार पडले. या ठिकाणी मंडलिक, मुश्रीफ, संजय घाटगे यांच्या आघाडीने सत्ता मिळवली.

53 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी 5 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित 48 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. बहुतांशी ठिकाणी चित्र-विचित्र आघाड्या, युत्या होत्या.

कागल तालुक्यातील पाच गावामध्ये सत्तांतर झाले. म्हाकवे येथे मुश्रीफ गटाची एकतर्फी सत्ता होती. या सत्तेला राजे समरजितसिंह, संजय घाटगे, रणजित पाटील गटाने सुरुंग लावत सात जागा जिंकल्या. तर मंडलिक-मुश्रीफ गटाने एकत्र निवडणूक लढवली होती. त्यांनी सहा जागा जिंकल्या.

पिंपळगाव बुद्रुक येथे गेली चाळीस वर्षे राजे गटाची सत्ता होती. या निवडणुकीत त्यांची सत्ता उध्वस्त करण्यात महाविकास आघाडीला यश मिळाले. बानगे येथे मुश्रीफ गटाच्या रविंद्र पाटील यांचा सत्तेचा गड ढासळला. या ठिकाणी राजे, मंडलिक, संजय घाटगे गटाने यश संपादन केले. 

हळदवडे येथे मुश्रीफ गटाची सत्ता संपुष्टात येऊन संजय घाटगे मंडलिक गटाने सत्ता हस्तगत केली. करंजीवणे येथे मुश्रीफांची सत्ता होती. याठिकाणी संजय घाटगे, मंडलिक,मुश्रीफ यांच्या आघाडीची सत्ता आली. 

हसुर खुर्द, पिंपळगाव बुद्रुक, भडगाव, करनुर, अर्जुनी, बेनिक्रे, खडकेवडा, मेतके, बोळावीवाडी, लिंगणुर कापशी, हळदवडे, बेलेवाडी मासा, लिंगनुर दुमाला, गलगले, सोनाळी, बस्तवडे, कौलगे, करंजिवणे, शेंडुर, सुळकुड, चिखली, सिद्धनेर्ले, तमनाकवाडा, कासारी, बिद्री, केंबळी, व्हन्नुर, शंकरवाडी, केनवडे या गावात महाविकास आघाडीने बाजी मारली. 
हासुर खुर्द, भडगाव, मेतके, साके, गलगले, बोळावीवाडी, बस्तवडे, हळदी या ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने सर्वच्या सर्व जागा जिंकल्या.

सिद्धनेर्ली येथील निवडणुकीत दत्तात्रय पाटील हे 471 इतक्या उच्चांकी मताने तिसऱ्यांदा निवडून आले. राघू हजारे व यशोदा हजारे हे पती-पत्नी पराभूत झाले. शंकरवाडी येथे अभिजीत व सोनाली पाटील या सख्ख्या बहिण-भावामुळे बिनविरोध होणारी निवडणूक दोन जागांसाठी झाली. ते दोघेही पराभूत झाले. करनूर येथे रोहन दाजीबा पाटील या 25 वर्षीय युवकाने अपक्ष लढत फक्त चार मतांनी बाजी मारून लक्षवेधी विजय नोंदविला. वंदूर येथे तेजस्विनी जोंधळे या डॉक्टर युवतीने विजय मिळविला.

हे पण वाचा - Gram Panchayat Results : गाव करील ते राव काय करील: चंद्रकांत पाटील यांना स्वतःच्या गावातच मोठा धक्का  
 
कासारी येथे महाविकास आघाडीची सत्ता आली. 9 पैकी 5 जागा बिनविरोध झाल्या होत्या. चार जागांसाठी मतदान झाले. यामध्ये 2 जागांवर महाविकास आघाडीचे तर दोन जागांवर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली. याठिकाणी अनिल नाईक व शिवाजी पाटील यांना समान मते मिळाली. मात्र चिठ्ठीवर अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील विजयी झाले.
 
सुळकुड ग्रामपंचायतीच्या संजय घाटगे गटाच्या विजयमाला आण्‍णासो पोवाडे यांनी विद्यमान सरपंच ज्योती अरुण पोवाडे यांचा एक मताने पराभव केला तर बिद्री ग्रामपंचायतीच्या शोभाताई राजेंद्र चौगुले यांनी दिपाली पांडुरंग कमळकर यांचाही एक मताने पराभव केला. तमनाकवाडा येथे अस्मिता लोहार एक मतांनी विजयी झाल्या. आलाबाद ग्रामपंचायतीमध्ये पती-पत्नी विजयी झाले.


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com