निवडणूक सोडून बोला ; नात्यागोत्याच्या राजकारणाने भावकी अडचणीत

grampanyat election in village politics between family in kolhapur
grampanyat election in village politics between family in kolhapur
Updated on

गडहिंग्लज (कोल्हापूर) : अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर गावागावांतील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. गावपातळीवरील लढाई आणि त्यात प्रभागपद्धतीमुळे अनेक ठिकाणी परस्परविरोधी उमेदवार एकमेकांचे संबंधित आहेत. काही ठिकाणी ते नात्यातीलही आहेत. त्यांना सत्तेची खुर्ची खुणावत असली तरी दोन्ही उमेदवारांशी संबंधित असलेल्यांना, भावकीसाठी निवडणुकीचे राजकारण अडचणीचे ठरत आहे.

कुणाच्या प्रचारात उतरायचे, हा त्यांच्यासमोर प्रश्‍न आहे. यातून प्रश्‍नालाच बगल देण्यासाठी घरात बसण्याच्या पर्यायावरही विचार सुरू असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी मध्यावर आली आहे. पहिल्या टप्प्यात इच्छुक उमेदवारी अर्ज भरत होते. पण, उमेदवारी कायम राहील की नाही, याची शाश्‍वती नव्हती. शिवाय, राजकीय पक्ष-गटांची आघाडी कशी होणार, यावरही बरेच अवलंबून होते. त्यामुळे कोण, कोणाशी लढणार, हे निश्‍चित नव्हते. मात्र, अर्ज माघारीच्या टप्प्यानंतर आघाड्यांची रचना आणि पर्यायाने लढाईचेही चित्र स्पष्ट झाले आहे.

निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार जनतेसमोर आले आहेत. मुळात ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे गावपातळीवरील लढाई. त्यात प्रभागपद्धतीने निवडणूक होते. एक प्रभाग म्हणजे दोन-तीन गल्ल्यांचा भाग. त्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय नशीब आजमावणारे बहुतांश उमेदवार एकमेकांशी संबंधित असतात. त्यांच्यात राजकीय वितुष्ट जरुर असेल. तीच परिस्थिती सर्वसामान्यांबाबत आहे. परस्परविरोधी दोन्ही उमेदवार संबंधित असल्याने निवडणुकीच्या या राजकारणात त्यांची मोठी अडचण झाल्याचे दिसून येत आहे.

जवळचे संबंध असल्याने प्रचारात सोबत करणे अपरिहार्य बनते. शिवाय, काही उमेदवार एकमेकांच्या नात्यातीलही आहेत. एका उमेदवाराच्या प्रचारात उतरणे म्हणजे दुसऱ्याला दुखावण्यातला प्रकार आहे. त्यामुळे झुकते माप कोणाला द्यायचे, हा प्रश्‍न आहे. जवळच्या दोन्ही उमेदवारांना बगल देऊन घरात बसण्याला प्राधान्य देण्याचा त्यांचा विचार सुरू आहे.

निवडणूक सोडून बोला...

दोन्ही उमेदवारांशी जवळचे संबंध असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यातील जाणकारांना मात्र भविष्यातील धोक्‍याची जाणीव आहे. नातेसंबंध दुरावण्यापेक्षा निवडणूक सोडून बोला, अशी त्यांनी भूमिका घेतली आहे. निवडणुकीसंदर्भात संपर्क साधणाऱ्या उमेदवारांना निवडणूक सोडून अन्य कोणतीही मदत करण्याचे आश्‍वासन त्यांच्याकडून दिले जाते.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why is Kolhapur water pumping banned?
Falling River Levels Trigger Water Scarcity Fears Across Kolhapur District
Kolhapur irrigation ban relaxation for farmers
Nagardale police constable news
Marathi News Esakal
www.esakal.com