अर्धा किमीचा रस्ता गायब झाल्याची उत्तूरच्या शेतकऱ्यांची तक्रार

अशोक तोरस्कर
Saturday, 23 January 2021

उत्तूर-आरदाळ पाणंद रस्त्यावर अतिक्रमण झाले असून अर्धा किमीचा रस्ता गायब झाला आहे.

उत्तूर : उत्तूर-आरदाळ पाणंद रस्त्यावर अतिक्रमण झाले असून अर्धा किमीचा रस्ता गायब झाला आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण दूर करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी आजरा तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, पूर्वी हा रस्ता राज्यमार्ग म्हणून परिचित होता. या रस्त्याला पर्यायी रस्ता उपलब्ध झाल्याने वाहतूक बंद झाली; मात्र शेतकरी हा रस्ता वापरत होते. या रस्त्याची नोंद शासन दप्तरी आहे. सध्या या रस्त्याच्या कडेला काही शेतकऱ्यांनी घरे बांधली आहेत. त्यामुळे येथे सावंतवाडी या नावाने नवीन वसाहत तयार झाली आहे.

या परिसरात 300 शेतकरी सुमारे 3500 टन ऊस पिकवतात. गावापासून ओढ्यापर्यंत 28 फूट व त्यापलीकडे 33 फूट रुंदीचा रस्ता होता; मात्र या रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे. या रस्त्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री सडक योजनेतून निधी मंजूर करून आणला आहे.

त्यामुळे येथील तातडीने अतिक्रमण हटवावे. निवेदनावर जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे, माजी सभापती वसंतराव धुरे, अमृतराव पाटील, एम. डी. सावंत, संभाजी कुराडे, पांडुरंग लकांबळे, मोहन लकांबळे, गणपती सावंत, श्रीपती सावंत, शंकर सावंत, व्यकंटेश मुळीक, सुधाकर सावंत, पुंडलिक पाटील, हणमंतराव पाटील, मुकुंद पाटील यांच्यासह शंभर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Half A KM Of Road Disappears, Uttar's Farmers Complain Kolhapur Marathi News