
‘शत्रूचा शत्रू, तो आपला मित्र’ या राजकारणातील नीतीप्रमाणे श्री. घाटगे यांच्याशी जुळवून घेतानाच ‘शाहू’चे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे
कोल्हापूर -‘होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी...’ अमर, अकबर, अँथनी चित्रपटातील हे प्रसिद्ध गीत. त्याचाच संदर्भ देत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मी, खासदार प्रा. संजय मंडलिक व माजी आमदार संजय घाटगे म्हणजे ‘अमर, अकबर, अँथनी’ असल्याचे सांगत श्री. घाटगे यांच्याशी मनोमिलनाचे संकेत दिले आहेत. त्याचवेळी जिल्हा बॅंक आणि ‘गोकुळ’मध्ये काय होईल ते होईल, असे सांगितल्याने या दोन्ही संस्थांच्या निवडणुकीचेही संदर्भ बदलण्याची शक्यता आहे.
पदवीधर निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारार्थ कागल येथे झालेल्या मेळाव्यात श्री. मुश्रीफ यांनी हे वक्तव्य करून तालुक्यातील राजकारणाची दिशाच एक प्रकारे स्पष्ट केल्याचे बोलले जाते. ‘शत्रूचा शत्रू, तो आपला मित्र’ या राजकारणातील नीतीप्रमाणे श्री. घाटगे यांच्याशी जुळवून घेतानाच ‘शाहू’चे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून शाहू कारखान्यासह सर्वच निवडणुकीत हे ‘अमर, अकबर, अँथनी’ एकत्र असतील याचेही संकेत श्री. मुश्रीफ यांनी दिले आहेत.
कागल तालुक्यात सध्या खासदार मंडलिक-मुश्रीफ एकत्र आहेत. ‘शाहू’चे समरजितसिंह घाटगे विधानसभेसाठी बांधणी करत आहेत. सद्यःस्थितीत मंडलिक-मुश्रीफ एकत्रच आहेत; पण समरजितसिंह यांना शह द्यायचा असेल तर संजय घाटगे सोबत पाहिजेत याची जाणीव श्री. मुश्रीफ यांना आहे. संजय घाटगे यांच्या राजकीय भाषणातूनही अलीकडे श्री. मुश्रीफांवरील टीका बंद झाली आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर श्री. घाटगे यांच्या साखर कारखान्याला श्री. मुश्रीफ यांनी जिल्हा बॅंकेतून केलेला कर्जपुरवठा आणि श्री. घाटगे यांच्याकडून मुश्रीफांवर बंद झालेली टीका पाहता हे दोघे पुन्हा एकत्र येऊ शकतात.
संजय घाटगे यांचे पुत्र अंबरीश ‘गोकुळ’चे संचालक आहेत. अंबरिश विरोधी गटातून विजयी झाले असले तरी सत्ताधाऱ्यांकडे कधी गेले ते समजलेच नाही. जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोध करून बॅंक पुन्हा ताब्यात ठेवणे मुश्रीफ यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत श्री. घाटगे यांच्या गटाला जिल्हा बॅंकेत संधी देऊन ‘गोकुळ’मध्ये सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याचे संकेतही श्री. मुश्रीफ यांनी या निमित्ताने दिल्याचे बोलले जाते.
हे पण वाचा - काटा मारणाऱ्यांचा काटा जनताच काढणार
२००७ चा इतिहास
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या २००७ च्या निवडणुकीत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्याविरोधात मुश्रीफ-संजय घाटगे एकत्र आले होते. त्या वेळी निवडणूकही दोघांनी जिंकली होती. त्यातून श्री. घाटगे यांचे पुत्र अंबरिश यांना पंचायत समितीचे सभापतिपद दिले होते. त्यामुळे सध्याची राजकीय स्थिती पाहता हे दोघे पुन्हा एकत्र येणार नाहीत, असे म्हणणे थोडे धाडसाचे ठरेल.
संपादन - धनाजी सुर्वे