
या मतदारसंघाचे प्रतनिधीत्व केलेल्या चंद्रकांतदादांनी आता पुढे काय करायचे ते ठरवावे, असा चिमटा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढला.
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोणत्याही आमदारांनी राजीनामा द्याव्या, त्या जागेवर निवडून आलो नाहीतर हिमालयात जाईन, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी केले होते. मात्र जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नाही. त्यामुळे कोणी राजीनामा देण्याचा काहीच प्रश्न नव्हता. मात्र चंद्रकांत पाटील यांनी ज्या पदवीधर मतदार संघाचे 12 वर्षे प्रतिनिधीत्व केले आहे त्या मतदार संघात भाजपचे उमेदवार थोड्याथोडक्या नव्हे तर 50 हजार मतांनी हारले आहेत.
पहिल्याच फेरीत त्यांचा दणदणीत पराभव झाला. त्यामुळे या मतदारसंघाचे प्रतनिधीत्व केलेल्या चंद्रकांतदादांनी आता पुढे काय करायचे ते ठरवावे, असा चिमटा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढला. तसेच किमान आता तरी झालेल्या चुकांबददल माफी मागावी, असे आवाहन केले.
हेही वाचा - अरूण लाड आमदार झाले पण प्रत्येक कुंडलकरांना वाटतेय आपणच आमदार -
ना. मुश्रीफ म्हणाले, पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील विजय आम्ही विनयाने घेतो. सत्ता आल्यानंतर काटा काढणे, विरोधकांच्या घरावर छापे घालणे असा प्रकार योग्य नाही. आमची आता सत्ता आहे म्हणून आम्ही सूड भावनेने वागत नाही. अशी भूमिका घेतली तर लोक बरोबर जागा दाखवतात हे या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. भाजपची सत्ता आल्यानंतर चंद्रकांतदादांनी मला राजकीय व सामाजिक जिवनातून उठवण्याचा प्रयत्न केला.
निवडणुकीच्या अगोदर महिनाभर धाड टाकण्यामागे मोठा अर्थ आहे. निवडणुकीत रसद मिळू नये म्हणून कागल, कोल्हापूर, पुणे मुंबई येथील निवासस्थानावर धाडी टाकल्या. बॅंकेवर प्रशासक आणले, कलम 88 नुसार चौकशी लावली, राज्य बॅंकेवर कारवाई केली. केवळ व्यक्तीगत दवेषातून चंद्रकांत पाटील यांनी ही कारवाई केली. त्यामुळे माझा संताप आहे. याबाबत त्यांनी एकदा माफी मागून हा विषय संपवणे आवश्यक असल्याचे ना.मुश्रीफ यांनी सांगितले.
चंद्रकांतदादांचे दोन चेहरे
चंद्रकांतदादांचा एक चेहरा हा दुसऱ्याला मदत केल्याचा, परोपकार केल्याचे दाखवण्याचा आहे. तर दुसरा चेहरा हा काटा काढण्याचा आहे. सत्ता आल्यानंतर चंद्रकांतदादांनी मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. भाजपत येण्याची त्यांनी ऑफर दिली होती. मात्र मी ती स्पष्टपणे नाकारली होती. त्यामुळे सूड भावनेतून कारवाई केल्यचा आरोप ना. मुश्रीफ यांनी केला.
हेही वाचा - 58 वर्षानंतर लाडांच्या घरात आमदारकी -
महापालिकेत चर्चा करुन निर्णय
महापालिका निवडणुकीत ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी तिन्ही पक्ष एकत्र येतील. ज्या ठिकाणी आमची ताकत जास्त आहे, तिथे दुसऱ्याचा फायदा होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करण्यासाठी श्रेष्ठींना पटवून देवू, असे सांगत महापालिका निवडणुकीतील भूमिका ना. मुश्रीफ यांनी स्पष्ट केली.
संपादन - स्नेहल कदम