'ती' आली जणू आमदारकी घेऊनच ; चार चाकीविषयी मुश्रीफांची भावना

संदीप खांडेकर
Monday, 14 September 2020

हसन मुश्रीफ अन्‌ कागलचं नातं अनोखं. ‘श्रावणबाळ’ ही त्यांच्या समर्थकांनी त्यांना दिलेली उपाधी.

 कोल्हापूर : हसन मुश्रीफ अन्‌ कागलचं नातं अनोखं. ‘श्रावणबाळ’ ही त्यांच्या समर्थकांनी त्यांना दिलेली उपाधी. जनता दरबारात प्रश्न सोडविण्याचा त्यांचा पॅटर्नही वेगळा. कागलचा मतदार जागरुक, तर  राजकारण्यांच्या पोटात शिरूनही राजकारण कळत नाही, असं म्हटलं जातं. कागलकरांची नाळ मात्र मुश्रीफांना कळली आहे. सलग पाचवेळा त्यांना कौल दिलाय. सध्या ग्रामविकास मंत्री पदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. पंचवीस वर्षांपूर्वी गाडीला घेतलेल्या ९०० नंबरवर त्यांची श्रद्धा आहे. ती अंधश्रद्धेतून नव्हे तर प्रत्येक निवडणुकीतील विजयाने मनात निर्माण झाल्याचे ते सांगतात.
 

राजकारणाचे विद्यापीठ अर्थात कागल. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ८० गावांच्या कागल तालुक्‍याची रचना झाली. कागलच्या राजकारणाला १९७२ नंतर उकळी फुटली. सदाशिवराव मंडलिक १९७२ च्या निवडणुकीत आमदार झाले. पुढे विक्रमसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाला कागलकरांनी स्वीकारले. १९९२ मध्ये कागल विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. मंडलिकांनी १९९८ च्या खासदारकीची निवडणुकीत विजय मिळवला. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. येथूनच मुश्रीफांच्या राजकारणाचा सूर्य उगवला. 

हेही वाचा- ...अन्‌ 102 वर्षीय साऊबाई कोरोनावर मात करुन चालत परतल्या घरी -

याचवर्षी ते आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले. तत्पूर्वी पंचायत समितीचे सभापती व जिल्हा परिषद सदस्य पदाचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. निवडणुकीपूर्वी मुश्रीफांच्या घरात आलेल्या गाडीवर ९०० नंबर झळकला होता. तो विजयासाठी भाग्याचा ठरल्याची भावना कुटुंबांत निर्माण झाली. तो प्रत्येक सदस्याच्या हृदयात घर करून राहिला. तेथून पुढे त्यांच्या घरात ज्या गाड्या आल्या त्यावर तो कोरला गेला. 

हा नंबरच मुश्रीफांसाठी ब्रॅंड ठरला. गावागावांत तो फेमस झाला. कागलचे आमदार म्हणून गावा-गावांत त्यांचा संपर्क दौरा आजही कायम आहे. त्यांच्या गाडीचा क्रमांक पाहताच मतदारांना ते कागलमध्ये आल्याची वर्दी मिळते. छोट्या-मोठ्या कामांसाठी मतदार सकाळीच त्यांचे घर गाठतात. काम होणार असा विश्वास त्यांचा असतो. प्रत्येक निवडणुकीत मतदार त्यांच्यामागे उभा राहिलाय. पाच निवडणुकांतील यश मतदारांचा त्यांच्यावरील विश्वास प्रकट करतो. वयाची पासष्टी ओलांडूनही जनसंपर्कात त्यांची हयगय नाही.

हेही वाचा- लग्नास नकार दिल्याने प्रेमविराकडून वाहनांची तोडफोड -

निवडणुकीत प्रतिस्पर्धी कोणीही असो, आपला विजय निश्‍चित यांचे पक्के समीकरण ते बांधतात. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वावर त्यांचा जबरदस्त विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून ते पवारनिष्ठ म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे कट्टर कार्यकर्ते तालुक्‍यात आहेत. मुश्रीफ यांच्या प्रेमापोटी आपल्या गाड्यांवर ९०० क्रमांक असावा, असे कार्यकर्त्यांना वाटणे स्वाभाविकच आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hasan mushrif faith in the 900 number he bought the car 25 years ago