कोल्हापूर जिल्हा परिषदेतून आरोग्याचे कोवीड योध्दा पुरस्कार वादात ; वशिलेबाजी झाल्याचा आरोप

सदानंद पाटील
Monday, 26 October 2020

अनेक प्रामाणिक डॉक्‍टर व कर्मचारी यांना डावलून काही नावे ही वशिल्याने दिली असल्याचा आरोप केला जात आहे.

कोल्हापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडून देण्यात येणाऱ्या कोवीड योध्दा पुरस्कारासाठी वशिलेबाजी झाला असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांसह कर्मचारी संघटना करु लागल्या आहेत. त्यामुळे हा पुरस्कार वादात अडकला आहे. अनेक प्रामाणिक डॉक्‍टर व कर्मचारी यांना डावलून काही नावे ही वशिल्याने दिली असल्याचा आरोप केला जात आहे. जर यात बदल झाला नाहीतर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कोवीड नियंत्रण, उपचार, योगदान देणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान या आठवड्यात केला जाणार आहे. यामध्ये कोवीडमध्ये काम करणाऱ्या आशा गटप्रवर्तक व सर्व संवर्गातील कंत्राटी, नियमित कर्मचारी, अधिकारी यांचा विचार केला जाणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचीच शिफारस करावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच सफाई कामगार, ऑक्‍सीजन बदलणारे तंत्रज्ञ, चाचणी केंद्रातील कर्मचारी यांचाही विचार करावा, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

हेही वाचा - शेतात पाणी हाय म्हणून रस्त्यावर मळणी काढलीया -

सध्या जी नावे पाठवण्यात आली आहेत त्यात पाच तालुका आरोग्य अधिकारी, सात वैद्यकीय अधिकारी, एक अधिक्षक, एक नोडल अधिकारी, आरोग्य सेविका एक, साथरोग तज्ञ एक, तंत्रज्ञ एक, विस्तार अधिकारी सांख्यिकी एक, सहा आरोग्य सहाय्यक, सहा आरोग्य सेवक, सेविका यांचा समावेश आहे. 

राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अतिरिक्‍त अभियान संचालक डॉ. सतीश पवार यांनी 15 ऑक्‍टोबरला पत्र पाठवून कोवीडमध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे कळवण्याचे आदेश दिले होते. ही नावे 19 ऑक्‍टोबरपर्यंत कळवणे आवश्‍यक होते. मात्र ही नावे खातरजमा न करता, परस्परच संगनमताने कळवल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. काही सदस्यही या प्रकरणात उतरले असून त्यांनी नावात बदल करण्याची मागणी केली आहे. मुळात अशा प्रकारची नावे कळवण्याची माहिती अधिकारी, कर्मचाऱ्यांना देणे आवश्‍यक होते. मात्र तसे न झाल्याने यात पारदर्शकता बाळगली नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

"जिल्हा परिषदेच्या अनेक अधिकारी, कर्मचारी यांनी चांगले काम केले आहे. त्यांना पुरस्कार न देता काही पुरस्कारार्थीची नावे ही वशिल्याने घातली आहेत. ही नावे रद्द करुन प्रामाणिक अधिकाऱ्यांची नावे न घातल्यास आंदोलन केले जाईल. या आंदोलनात कोवीडमधून बरे झालेल्या रुग्णांचा समावेश असेल." 

- वंदना मगदूम, माजी महिला व बालकल्याण समिती सभापती

हेही वाचा - नव्वद टक्के कोचिंग क्लासेस डबघाईला ; चालकांच्या चिंतेत वाढ -

"शासनाने कोवीड योध्दा पुरस्कारासाठी नावे मागवण्याचे पत्र 17 ऑक्‍टोबरला देत 19 ऑक्‍टोबरपर्यंत नावे देण्याची सुचना केली. दोन दिवसात सर्वांना कळवून ही नावे संकलित करणे अशक्‍य होते. तरीही तालुक्‍याशी संपर्क साधून नावे घेण्यात आली. मात्र आता याबाबत तक्रारी सुरु आहेत. त्यामुळे पुन्हा चर्चा करुन नावे घेतली जात आहेत. दिवसभरात जेवढी नावे येतील त्याची छाननी करुन शिफारस करण्यात येईल. यात कोणतीही वशिलेबाजी झालेली नाही." 

- डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: health covid awards given by kolhapur zilha parishad accused from declared people for exact for this award in kolhapur