कापलेले भात गेले पाण्यात अन् शेतकरी अडकला संकटात 

मिलिंद देसाई
Tuesday, 20 October 2020

सातत्याने पाऊस सुरु असल्यामुळे बेळगाव शहर आणि जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यात शेतातील कापणी केलेल्या भातपिकामध्ये पाणी साचून नुकसान झाले आहे

बेळगाव : यंदा बेळगाव जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला असतानाच परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. पावसाच्या तडाक्‍यामुळे भात, भुईमूग, नाचण्यासह भाजीपाला पिकांची मोठी हानी झाली आहे. आधीच लॉकडाउन आणि कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी हवालदिल बनला आहे.

सातत्याने पाऊस सुरु असल्यामुळे बेळगाव शहर आणि जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यात शेतातील कापणी केलेल्या भातपिकामध्ये पाणी साचून नुकसान झाले आहे. शिवारात पाणी साचल्याने भातपिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. मात्र भात पडल्याने पाणी जाण्यास बाहेर काढण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून जिल्ह्यात पडत असलेल्या पावसाचा खरिपाच्या सर्वच पिकांना फटका बसत आहे. पावसात भिजल्यामुळे भात काळे पडत असून उत्पादनातही घट होण्याची भिती व्यक्‍त केली जात आहे. अनेक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतात साचलेल्या पाण्यात भुईमूग पीक भुईसपाट झाले आहे. 

हे पण वाचा - 'अन्यथा महावितरणला 27 आक्‍टोबरला टाळे ठोकणार' 

जिल्ह्याच्या विविध भागांत चार दिवसांपासून परतीच्या पावसाचा दणका सुरुच आहे. जिल्ह्यात सर्वत्र कमी जास्त प्रमाणात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. 

हे पण वाचामहाराष्ट्रात तीन सावत्र भावांचे सरकार 

सतत पडणाऱ्या पावसामुळे काढणीला आलेली खरीप पिके, भाजीपाला, फुलांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे भातकापणीही करता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यावेळी मॉन्सूनला सुरुवात झाल्यानंतर काही दिवस पावसाचा जोर कमी होता. मात्र त्यानंतर सातत्याने पावसाने हजेरी लावल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain in belgaum