महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने कोल्हापूरकरांना झोडपले पण...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

काही भागात पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या. ग्रामीण भागात मात्र पावसाची अजूनही प्रतिक्षाच आहे. 

कोल्हापूर - गेले महिनाभर दडी मारलेल्या पावसाने आज शहर आणि परिसराला चांगलेच झोडपून काढले. पावसाला सुरूवात होईल असे वाटत असतानाच हा पाऊस थांबला आणि पुन्हा कडाक्‍याचे ऊन पडले. निसर्गाच्या लहरीपणाचे दर्शन आज पुन्हा झाले. 

मृग नक्षत्राच्या मुहुर्तावर व त्यानंतर जिल्ह्यात दमदार हजेरी लावलेल्या पावसाने गेल्या महिन्याभरापासून दडी मारली आहे. गेल्या वर्षीचा अनुभव पाहता धरणांतूनही पाणी सोडण्यात आले. पण अख्ख्या जुलै महिन्यात पाऊस फिरकलाच नाही. अधूनमधून दिसणारे ढगाळ वातावरण सोडले तर ऐन पावसाळ्यात कडक्‍याच्या ऊन्हाळ्याचा अनुभव येत होता. आज सकाळी तर कडकडीत ऊन होते, पाऊस गेला की काय अशी परिस्थिती जाणवत असतानाच दुपारी धुवॉंधार पावसाने शहर व परिसराला झोडपून काढले. काही भागात पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या. ग्रामीण भागात मात्र पावसाची अजूनही प्रतिक्षाच आहे. 

गेल्यावर्षी 31 जुलैला पाऊस सुरू झाला, पण त्यावेळी जोर कमी होता. 3 ऑगष्टपासून मात्र कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यात पावसाने हाहाःकार उडवून दिला होता. कोल्हापुरात पंचगंगेचे, सांगलीत कृष्णा नदीचे पाणी थेट शहरात आणि नागरी वस्तीत घुसले होते. अचानक आलेल्या या संकटामुळे प्रशासन आणि नागरीकही हादरून गेले होते. त्याची पुनरावृत्ती आजपासून होईल असे वाटत असतानाच पुन्हा पाऊस गायब झाला. 

हे पण वाचा टेरेसवर खेळत असताना मुलासोबत घडली दुर्देवी घटना

 

पावसाअभावी पिकेही धोक्‍यात आली आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामाची पेरणी पूर्ण झाली आहे, आता या पिकांना पावसाची गरज आहे. बळीराजाही आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. मध्यंतरी झालेल्या पावसाने पिकेही जोमात आहेत, पण त्यानंतर पाऊस न पडल्याने हीच पिके धोक्‍यात आली आहेत. आणखी काही दिवस अशीच स्थिती राहीली तर दुबार पेरणीचे मोठे संकट शेतकऱ्यांसमोर आहे. याशिवाय उत्पादनातही मोठी घट होण्याची शक्‍यता आहे. कोरोनाच्या संकटाशी सामना करणारा ग्रामीण भाग पावसाने दडी मारल्याने चिंताग्रस्त झाला आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain in kolhapur district