esakal | १८५७ च्या बंडाची साक्ष देणारी कोल्हापुरातील दुर्मिळ वास्तू
sakal

बोलून बातमी शोधा

Heritage of Kolhapur padmavati information by uday gaikwad

३१ जुलै १८५७ ला सदर बाजार नेटीव्ह इन्फनट्री फलटनीची छावणी होती.

१८५७ च्या बंडाची साक्ष देणारी कोल्हापुरातील दुर्मिळ वास्तू

sakal_logo
By
उदय गायकवाड

कोल्हापूर : पद्यमाळा तलावाच्या काठावर पद्मावतीच्या मंदिरा जवळ राधाकृष्ण मंदिर आहे. रेसकोर्सचा परिसर येथून जवळच होता.  मंदिराच्या सभोवती घोड्याच्या पागा असाव्या तश्‍या इमारती आहेत. मध्यभागी मंदिर असून, अलीकडे पागाचा वापर लोक रहाण्यासाठी करीत आहेत. १८५७ च्या बंडात ही वास्तू ब्रिटिशांच्या विरोधात लढणाऱ्या बंडखोरांना आश्रय देणारी ठरली म्हणूनच वारसास्थळ म्हणून ितचं महत्त्‍व समजून घेतल पाहिजे.


साध्या पद्धतीने बांधलेले हे देऊळ छोट्या आकाराचे आहे. मंदिरात मुरलीधर स्वरूपातील श्रीकृष्णाची मूर्ती संगमरवरी दगडाची आहे. त्या शेजारी राधेची मूर्ती आणि दोघांच्यामध्ये गायीची प्रतिकृती आहे. डाव्या बाजूला दुसरी छोटी प्रतिकृती कृष्णाचा साथीदार असावा. या मूर्ती उत्तराभिमुख आहेत. एक स्त्रीची मूर्ती पश्‍चिम दिशेला तोंड करून असून, ती गोपी असावी.
मंदिराचा कळस मात्र वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. शिंदेशाही पगडीतील राजा, सेवक, हत्ती, अशा प्रतिमा चुन्याच्या कामात बनवलेल्या असून, नक्षीने शिखर व्यापले आहे. कोल्हापूर परिसरात असे शिखर असलेले हे एकमेव मंदिर आहे. शिखराच्या भागात आठ दहा लोक बसू शकतील अशी जागा आहे. मंदिरासमोर कौलारू छपराचा मंडप आहे. परिसरात हत्तीचे एक मंदिर आहे. 


३१ जुलै १८५७ ला सदर बाजार नेटीव्ह इन्फनट्री फलटनीची छावणी होती. तेथील दोनशे सैनिकांनी उठाव करून ४०-५० हजार रुपये लुटले, दारूगोळा घेतला व लाईन बझार परिसर लुटला. कर्नल मोहैम हा रेसिडेंट रहात असलेल्या बंगल्यावर हल्ला केला. मात्र, प्रतिकार झाल्याने त्या सैनिकांना मागे फिरावे लागले. दरम्यान शहराची तटबंदिवरील पहारा आणि सर्व दरवाजे रात्री आठ वाजता बंद केले जात असल्याने या सैनिकांनी  मंदिरासभोवती असलेल्या पागामध्ये बंडकऱ्यानी आश्रय घेतला. वाटेत स्नायडर यास जखमी केले. हे समजताच कर्नल मोहैमने पागेवर हलला केला. तो परतवण्यात लपलेले सैनिक यशस्वी झाले आणि  कर्नल मोहैम जखमी झाला. दुसऱ्या दिवशी दोन प्रहरी काही सैनिक फोंडा घाटातून कोकणात जाताना सोळांकुरच्या व्यंकनाथाच्या मंदिरात लपलेल्या तीन इंग्रज अधिकाऱ्यांना मारून त्यांची प्रेते दूधगंगा नदीत फेकली. ५० हजार रुपये लुटले व  घाट मार्ग रोखल्याचे समजल्याने ते सावंतवाडीकडे पोचले, काही कोल्हापूरला आले. परत आलेल्या सैनिकांनी पुन्हा पागेचा आश्रय घेतला.

दहा ऑगस्टला पुन्हा लेफ्टनट कर या आधिकाऱ्याने ५० घोडेस्वार, दोन तोफा, बंदुकानी पागेवर हलल केला. सभोवतालच्या तटावर तोफा डागल्या. मात्र, हा परिसर अभेद्य राहिला होता. फितुरांनी माहिती दिल्यानं लेफ्टनट कर याला चोरवाट कळली. त्याने तीन चार सैनिकांना घेऊन आत शिरून बंडकऱ्याना घेरले. तिथेच एकाला बलिदान द्यावे लागले. केवळ चाळीस लोकांनी जेरीला आणल्याने लेफ्टनट करला आश्‍चर्य वाटले. त्या सर्वांना अटक करून  १० ऑगस्ट १८५७ रोजी काहींना फाशी तर काहींना तोफेच्या तोंडी दिले गेले. अशी ही वास्तु १८५७ च्या बंडातील रक्त रंजीत इतिहासाची साक्ष देते आहे म्हणून तिचे इतिहासात वारसा स्थळ म्हणून अधोरेखित होते. 

हेही वाचा- दैव बलवत्तर म्हणून चिमूकलीचा वाचला जीव; एका क्षणांत झाला असता होत्याच नव्हत -


आज मंदिराभोवती तट नाही. पागेच्या इमारतीत आज लोक रहात आहेत. परिणामी येथील स्वरूप पूर्ण बदलले आहे. एका अर्थाने मंदिरही दुर्लक्षित झाले आहे. कळसाची देखभाल तातडीने करण्याची गरज आहे. १८५७ च्या बंडाची साक्ष म्हणून वास्तूला राज्य संरक्षित स्मारक दर्जा द्यायला हवा.


संपादन- अर्चना बनगे