
नगारखान्याच्या इमारतीला लागून असलेली ही इमारत राजवाड्याच्या थाटात उभी आहे.
कोल्हापूर : मेन राजाराम हायस्कूल असलेली वास्तू ही राजाराम कॉलेज म्हणून पूर्व पिढीला परिचित आहे. वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेली ही वास्तू उत्तम वारसा आहेच; पण त्या इमारतीत शिकून देश-विदेश पातळीवर कामाचा आणि नावाचा वारसा निर्माण करणाऱ्यांनीही कोल्हापूरचे नाव उज्ज्वल केले आहे.
नगारखान्याच्या इमारतीला लागून असलेली ही इमारत राजवाड्याच्या थाटात उभी आहे. १८८० मध्ये मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीत सुरू झालेले कॉलेज १९१९ ते १९२५ पर्यंत उत्तर प्रदेशातील आर्य प्रतिनिधी सभा चालवत होती. १९२७ मध्ये छत्रपतींनी शेती, विज्ञान शाखा सुरू करून मागासर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, परितोषके सुरू केली. मुलींना मोफत शिक्षण इथे दिले.
पाच लाख रुपये खर्च करून काळ्या दगडात बांधलेल्या, दुमजली असलेल्या या इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार पोर्चसारख्या कमानीतून आहे. तेथील दरवाजा थेट सभागृहात उघडतो. दोन्ही बाजूच्या बहुकोनी टॉवरसारख्या रचनेतील गोल जिन्याने वरच्या मजल्यावर जाता येते. तळमजल्यावर सभगृहाच्या दोन्ही बाजूला वर्ग खोल्या असून, त्यापुढे प्रशस्त व्हरांडा सुंदर नक्षीदार खांब आणि त्यावर आधारलेल्या कमानीच्या सौंदर्यात शोभणारा आहे. दुसऱ्या मजल्यावर अशीच रचना आहे. दोन्ही मजल्यांची उंची मध्यवर्ती सभागृहाला आहे.
.
तिसऱ्या मजल्यावर एक हॉल असून, उर्वरित रिकाम्या गच्चीला प्रत्येक कोपऱ्यावर घडीव दगडाच्या खांबांच्या चौकोनवर घुमटाकार छत्री आहे.मुख्य इमारतीसमोर करवीर नगर वाचनालय असून, तिथे घडीव खांबांच्या गेटमधून आत आल्यावर कारंजाचा हौद आहे.मागील बाजूस दुमजली इमारत पागा बिल्डींगच्या भिंतीला लागून आहे. मुख्य इमारतीपासून या इमारती दरम्यान खुले मैदान असून, तेथून जुन्या राजवाड्याच्या चौकात जाता येते. अलीकडे हा मार्ग बंदीस्त आहे.
हेही वाचा-काँग्रेस, राष्ट्रवादीला सत्तेवरून खेचण्यासाठी व्यूहरचना
प्रत्येक खोली तील भिंतीवर असलेले नक्षीकाम, छतावरील सजावट आणि भव्य नक्षी, दरवाजे, खिडक्या, जाळ्या, पार्टीशन, खांबावरील नजाकत आजही नजर खिळवून ठेवणारी आहे. काळ्या दगडात बांधलेली ही वास्तू हवेशीर, थंड आणि शांत आहे. परिसरातील मोठे वृक्ष इमारतीस धोका निर्माण करणारे आणि दृिष्टक्षेपात अडथळा आणणारे आहेत. त्याच्या निगराणीची आवश्यकता आहे. इमारतीची निगराणी तुलनेने चांगली असली तरी ती नियमित करणे आवश्यक आहे. केलेले काही नव्याने बांधकाम काढून टाकणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या ताब्यात असणाऱ्या या इमारतीकडे वारसास्थळ म्हणून तसे फारसे लक्ष दिले गेले नाही. हा वैभवशाली परिसर पार्किंगच्या सुविधेला वापरण्याचा करंटेपणा महापालिका आणि वाहतूक पोलिसांना का सुचतो हे आश्चर्य आहे.
शाळेच्या वेळेखेरीज बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना या परिसरात वावरता आले तर डोळे भरून हा वारसा पहाता येईल.
राजस्थानी पद्धतीची झाक असलेली मध्ययुगीन दख्खनी कलेचा किंवा मराठा रियासतीचा हा ठेवा राजवैभव घेवून उभा आहे. मानबिंदू ठरणारी ही वारसा वास्तू नजरेआड होता कामा नये, अशी संधी घेतली पाहिजे.
इथे कोण शिकले ?
महादेव गोविंद रानडे
वामन शिवराम आपटे
गोपाळ कृष्ण गोखले
न. चिं. केळकर
गोपाळ टेंबे
पी. सी. पाटील
गोविंदराव टेंबे
अण्णासाहेब लठ्ठे
वासुदेव मिराशी
खाशाबा जाधव
बाळासाहेब देसाई
व्ही. टी. पाटील
जे. पी. नाईक
विश्वनाथ घाटगे
बी. डी. जत्ती
यशवंतराव चव्हाण
संपादन- अर्चना बनगे