अख्खं शहर या आवाजावर लावत होतं घड्याळ, तो भोंगाही झाला शांत

उदय गायकवाड
Friday, 1 January 2021

शाहू मिल : औद्योगिक क्रांतिपर्वाचा महत्त्वपूर्ण वारसा

 कोल्हापूर :  औद्योगिक क्रांतीची सुरवात स्वातंत्र्योत्तर काळात झाली, असे मानले जात असले तरी कोल्हापूर त्याला अपवाद होते, असे म्हणावे लागेल. १९०६ मध्ये शाहू मिलची सुरवात करून उद्योगाचे नवे पर्व सुरू केले. हा महत्त्वपूर्ण वारसा १०० वर्षेही आपण टिकवू शकलो नाही. आज मिलच्या सर्व वास्तू निर्जीव अवस्थेत आहेत. यंत्र, साधने काढून टाकल्यावर त्यांची धडधड थांबली आहे. एकेकाळी अख्खं शहर ज्याच्या आवाजावर आपले घड्याळ लावत होतं, तो भोंगाही आता निमूटपणे शांत झाला आहे. या परिसरातील धीरगंभीर शांतता आता अनेक प्रश्नाचं काहूर माजवते.
 

छत्रपती शाहू महाराजांची दूरदृष्टी ही अनन्यसाधारण होती. १९०२ च्या दुष्काळानंतर विकासाच्या कामांनी वेग घेतला. १९०५ मध्ये अनेक नव्या उद्योगांना प्रोत्साहन दिले होते. मधुमक्षिका पालन, औषधी तेल, काष्ठअर्क, तेल गिरणी, जिनिंग मिल, ३१०२ हातमाग संस्थानात सुरू केले होते. यंत्रमागाची मोठी गरज या काळात निर्माण झाली होती.

२७ सप्टेंबर १९०६ ला शिलान्यास करून मीलचे काम सुरू केले. कोटीतीर्थ तलावाच्या काठावर ही वास्तू उभारली गेली. १४ ऑगस्ट १९१५ ला छत्रपती शाहू महाराजांनी लिहिलेल्या एका पत्रात श्री रघुपती पंडित महाराज यांच्याकडे मिलची उभारणी करण्यासाठी जबाबदारी दिलेली दिसते. श्री शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विव्हींग मॅन्युफॅक्‍चरिंग कंपनी लिमिटेड या नावाने कापड उत्पादन सुरू केले. संयुक्त भांडवलावर सुरू झालेली ही मिल एक वर्षानंतर दरबारने चालविण्यास घेतली.

सुरवातीच्या काळात मिलचे व्यवस्थापन जेम्स फिनले आणि कंपनीकडे १९३५ पर्यंत होते. संस्थानचे मुंबई संस्थानात विलीनीकरण झाल्यानंतर गिरणी मुंबई राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्यात आली.सूतगिरणी म्हणून सुरू झालेल्या या गिरणीत १९२१-२२ मध्ये ११ हजार १११ चात्यांवर ४३७ कामगार काम करीत होते.१९ ऑक्‍टोबर १९२६ ला मुंबई गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांच्या हस्ते विणकाम विभाग सुरू झाला. १ जानेवारी १९२७ ला दरबारतर्फे एक बोर्ड नेमण्यात आले.

महायुद्ध काळात कापडाला चांगली मागणी आली. १९४७-४८ मध्ये ३१९ माग आणि १५९८ चात्या होत्या. एक पाळी कापड विनाई, तर दोन पाळ्या कताई चालत होती.१९५६ पर्यंत ४१ लाख ३८ हजार ६२५ रुपयांची गुंतवणूक होती, त्यातील २३ लाख ८७ हजार २८० रुपये इमारत व यंत्राचे होते. त्या काळात ५६ लाख वार कापड आणि २४ लाख ६७ हजार पौंड सूत उत्पादन झाले होते. ९५९ कामगार इथे कामाला होते. १९६६ मध्ये वस्त्रोद्योग महामंडळाच्या नियंत्रणाखाली ७० लाख रुपये खर्च करून अद्ययावत करण्यात आले.

कापडाला रंग देण्याची गरज लक्षात घेऊन डायहाउस सुरू केले. इथे मांजरपाट, पांढरे कापड, बेडशीट, साडी, धोतर असे उत्पादन सुरू झाले होते. बहुचर्चित ठरलेली ही उत्पादने बाजारात मोठी मागणी असणारी होती. व्यापारी स्पर्धा आणि व्यवस्थापकीय निष्काळजीपणामुळे मील बंद पडली. आज अनेकांचा जमिनींवर डोळा असलेल्या या जागेची किंमत करोडोमध्ये असली तरी मूल्य मात्र करता येणार नाही. आज पुन्हा एकदा भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी या वास्तूचे पुनर्जीवन करून वारसा जपण्याबरोबरच नवी संधी साधली पाहिजे आणि छत्रपती शाहूंचे कार्य टिकवले पाहिजे.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heritage of kolhapur shahu mill information by uday gaikwad