हिंदी दिन विशेष : मन, पोटही भरवते हिंदी भाषा

नंदिनी नरेवाडी
Monday, 14 September 2020

विविध कंपन्यांत संवादकासाठी विद्यार्थ्यांना नवी रोजगार संधी

कोल्हापूर : हिंदी भाषेतील रोजगार संधी ‘लोकल टू ग्लोबल’ उपलब्ध होत आहेत. स्थानिक पातळीवरील साहित्याचे अनुवाद, जाहिरातींचे भाषांतर असो किंवा मल्टिनॅशनल कंपन्यांत संवादक म्हणून असो, अशा विविध पातळ्यांवर हिंदी भाषेचे कौशल्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थार्जनाचे नवे साधन निर्माण होऊ लागले आहे. हिंदी भाषेवरील प्रभुत्व सिद्ध करत तरुणाई या भाषेकडे संधी म्हणून पाहत आहे. 

गरजू विद्यार्थ्यांना याची ओळख व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्यभाषा सभा राज्यस्तरावर काम करत आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत, सरकारी पातळीवर तसेच स्थानिक पातळीवरील रोजगाराची माहिती उपलब्ध करून दिली जाते. स्थानिक पातळीवरील विविध प्रकाशन संस्था तसेच विदेशी चित्रपटांचे उपशीर्षक बनविण्यासाठी अनुवादकाची गरज भासते. विविध वर्तमानपत्रांतून अनुवादकांना उत्तम संधीही उपलब्ध होतात. सध्या इंटरनेटच्या युगात विविध वेबसाईटवर हिंदी भाषेत लिखाण करण्यासाठी अनुवादक लागतात. देशात कार्यरत असणाऱ्या पर्यटन कंपन्या, मोठी हॉटेल्स, विविध देशांचे दूतावास, बहुराष्ट्रीय कंपन्या, कार्पोरेट हाऊसेस यांनाही अनुवादकांची आवश्‍यकता असते. भाषेवरील प्रभुत्वासह माहिती तंत्रज्ञानातील कौशल्य संपादित केल्यास सॉफ्टवेअर कंपन्यांमध्येही नोकरीच्या संधी खुणावतात. 

हेही वाचा- ती आली जनू आमदारकी घेऊनच ; चार चाकीविषयी मुश्रीफांची भावना

अनेक विविध भाषांतील पुस्तकांचे अनुवाद करण्यासाठी अनुभवी हिंदी अनुवादक प्रशासन संस्थेला हवे असतात. सध्या अनेक इंग्रजी पुस्तके हिंदीमध्ये अनुवादित होत आहेत. भाषांतरकार आणि अनुवादक यांना आलेले अच्छे दिन ओळखून विविध शैक्षणिक संस्थांनी अनुवादातील अभ्यासक्रम सुरू केले आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ट्रान्सलेशन हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. याचा कालावधी किमान एक ते जास्तीत जास्त चार वर्षे आहे. हिंदी भाषेतील अनुवादाचे कौशल्य या अभ्यासक्रमात शिकवले जाते.

हिंदी भाषेतील प्रभुत्वामुळे अनुवाद आणि भाषांतर क्षेत्रात विविध नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. ग्रामीण गरजू विद्यार्थ्यांना घरबसल्याही अनुवादाची कामे करता येतात. महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेतर्फे विद्यार्थ्यांना या नोकरीच्या संधीविषयी तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन केले जाते. या क्षेत्राकडे हिंदी भाषेच्या विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे.
- अविनाश पाटील, सचिव, विभागीय समिती, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा.

दुभाषक म्हणूनही संधी
हिंदीतून पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर राजभाषा अधिकारीपदासाठी परीक्षा देता येतात. या परीक्षेनंतर बॅंका, केंद्र शासनाच्या कार्यालयात वरिष्ठ राजभाषा अधिकारी व कनिष्ठ राजभाषा अधिकारीपदी नियुक्ती होते. तसेच विमा कंपन्या, रेल्वे, पोस्टातही नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. तसेच देशाच्या इतर देशांतील दूतावासातही दुभाषक म्हणून नोकरीची संधी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मिळवता येते. 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hindi day special New employment opportunities for students to communicate in various companies