हिरण्यकेशी नदीत चार किलो मीटरमध्ये पाच बंधारे..! याचा गडहिंग्लजला फटका बसतोय का?...वाचा सविस्तर..

अजित माद्याळे
Monday, 24 August 2020

आंबोलीत उगम असलेल्या हिरण्यकेशी नदीला आंबोली परिसर आणि आजऱ्यातील मुसळधार पावसामुळे खरे तर पूर येतो. आता सर्वत्र तीन दिवस पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे नदीत त्या प्रमाणात पाण्याची आवक नसली तरीसुद्धा पूरस्थिती कायम आहे.

गडहिंग्लज : आंबोलीत उगम असलेल्या हिरण्यकेशी नदीला आंबोली परिसर आणि आजऱ्यातील मुसळधार पावसामुळे खरे तर पूर येतो. आता सर्वत्र तीन दिवस पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे नदीत त्या प्रमाणात पाण्याची आवक नसली तरीसुद्धा पूरस्थिती कायम आहे. निलजी बंधाऱ्यावर शनिवारीसुद्धा (ता. 22) पाणी होते. खणदाळसह कर्नाटकच्या हद्दीत अवघ्या चार किलोमीटरमध्ये पाच बंधारे असल्याने पूर ओसरण्यास अडथळा येत असल्याचा निष्कर्ष काढण्यात येत आहे. मुळात तांत्रिकदृष्ट्या दोन बंधाऱ्यांमध्ये किमान सहा ते आठ किलोमीटरचे अंतर असावे असे सांगितले जाते; येथे मात्र याला हरताळ फासल्याचे दिसत आहे. परिणामी नदीकाठावरील शेतीतील कायमच्या पाण्यामुळे पिके कुजत आहेत. 

गतवर्षीचा (2019) अपवाद वगळता त्यापूर्वी हिरण्यकेशी नदीला आलेला पूर एक दिवस पाऊस नसला तरी लगेचच ओसरायचा. बंधारे असलेल्या गावातील जुन्या जाणत्या मंडळींकडून हा अनुभव ऐकायला मिळतो. यंदा या नदीला तिसऱ्यांदा पूर आला. पावसाने विश्रांती घेऊनही प्रत्येक वेळचा पूर ओसरण्यासाठी वेळ लागला. हिडकल जलाशयातील विसर्गामुळे पूर ओसरत नाही, असा अंदाज काढला जायचा. विसर्ग जर मोठा असेल, तर नदीचे पाणी पुढे जाण्यास अडथळा येतो. परिणामी फूग तयार होते; परंतु ही फूग इतक्‍या लांबपर्यंत येत नसून त्याचा परिणाम संकेश्‍वरपर्यंतच जाणवतो, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अडथळ्याचा शोध घेतला असता वेगळेच कारण पुढे येत आहे. 

खणदाळ बंधाऱ्याजवळच महाराष्ट्राची हद्द संपते. त्यापुढे कर्नाटक हद्द सुरू होते. शंकरलिंग मठाजवळ कर्नाटकने बंधारा बांधला आहे. विशेष म्हणजे गरज नसतानाही पाणी अडवण्याची व्यवस्था येथे केली आहे. त्यापुढे राष्ट्रीय महामार्गावरील मोठा पूल आणि त्याचे 12 पिलर्स आहेत. तेथपासून काही अंतरावरच नांगनूर येथे जुन्या बंधाऱ्याजवळच नवीन बंधारा कर्नाटकने बांधला आहे. पाणी विसर्गासाठी मोठा अडथळा आहे तो याच ठिकाणी. जुन्या बंधाऱ्यातून जाणारे पाणी नव्या पुलाला धडकून पुन्हा मागे येत आहे. दोन्ही बंधाऱ्यांच्या मध्येच पाणी घुटमळत असून त्यामुळे जुन्या बंधाऱ्यातील पाण्याची पातळी अधिक आणि नव्या बंधाऱ्याखालील बाजूला पाणी पातळी कमी असे चित्र दिसते.

हे चित्र पाहणाऱ्यांना पाण्याच्या विसर्गाची संथ गती लक्षात येते. जुन्या बंधाऱ्याच्या दरवाजांमधील अंतर तीन ते साडेतीन फूट इतकेच आहे. परिणामी मुळातच यातून पाण्याचा विसर्ग कमी होतो. त्यात नव्या बंधाऱ्यांची भर पडल्याने पाण्याची फूग वाढत आहे. सध्या तीन-चार दिवस पाऊस नसला तरी बंधाऱ्याच्या बरोबरीने नदीपात्रात पाणी आहे. निलजी बंधाऱ्यावर तर शनिवारीही पाणी होते. पाण्याचा विसर्ग अपेक्षित होत नसल्याने हा फूग निलजी, जरळी बंधाऱ्यापर्यंत दिसत असल्याचेही पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे. 

कर्नाटकची मनमानी 
तीन किलोमीटरमधील पाच पैकी केवळ खणदाळ बंधारा महाराष्ट्रातील आहे. नांगनूरमधील दोन, शंकरलिंग मठ आणि खोत बंधारा असे चार बंधारे कर्नाटक हद्दीत आहेत. नवा बंधारा उभारताना कर्नाटकने महाराष्ट्र सरकारशी कोणतीही चर्चा केलेली नाही. मुळात तांत्रिकदृष्ट्या दोन बंधाऱ्यांमध्ये किमान सहा ते आठ किलोमीटरचे अंतर असावे असे सांगितले जाते; परंतु कर्नाटकने मन मानेल त्या पद्धतीने बंधारे उभारल्याने त्याचा फटका पावसाळ्यात शेतकऱ्यांना बसत आहे. नांगनूरला नवीन बंधारा बांधला असला तरी त्यांनी जुना बंधारा अजूनही काढलेला नाही. 

जुना बंधारा तत्काळ निर्लेखित करण्यास सांगितले
नांगनूरजवळच्या बंधाऱ्यांना भेट देऊन पाहणी केली. दोन्ही बंधाऱ्यांमध्ये पाणी घुटमळत असल्याने विसर्गाला अडथळा येतोय. परिणामी, मागच्या दिशेला दीड मीटरने पुराच्या पाण्याची फूग वाढलेली दिसते. शिवाय या पाण्याने नव्या बंधाऱ्याच्या पायालाही धोका पोहचण्याची शक्‍यता आहे. कर्नाटकच्या मंत्री शशिकला ज्वोल्ले व खासदार आण्णासाहेब ज्वोल्ले यांच्यासोबतच्या बैठकीत हा मुद्दा मांडला आहे. जुना बंधारा तत्काळ निर्लेखित करण्यास सांगितले आहे. पत्रव्यवहारही केला जाणार आहे. 
- स्मिता माने, कार्यकारी अभियंता, कोल्हापूर दक्षिण पाटबंधारे. 
 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hiranyakeshi River Has Five Dams In Four Kilometers Kolhapur Marathi News