
सध्या सुरु असलेले लॉकडाऊन 28 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत
कोल्हापूर : जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तु, दुर्ग, किल्ले, स्मारके, संग्रहालये पर्यटकांसाठी आजपासून खुली करण्यात आली आहेत. तर, सध्या सुरु असलेले लॉकडाऊन 28 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.
आदेशात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यात विविध ऐतिहासिक वास्तुंचा वारसा आहे. विविध ऐतिहासिक वास्तू, दुर्ग, किल्ले, स्मारके, संग्रहालयाला लाखो पर्यटक भेट देतात. पर्यटकांमुळे मोठ्या प्रमाणावर स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे सुरु करावीत अशी वारंवार मागणी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून सर्व दुर्ग व ऐतिहासिक वास्तू खुले केले जात आहे. हे स्थळे खुली करत असताना संबंधीत विभागाने सर्व स्थळांवर आवश्यक ठिकाणी निर्जंतूकीकरण करावे लागणार आहे. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तिवर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही श्री देसाई यांनी दिला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. या निर्णयाचाही फायदा पर्यटकांसह कोल्हापूर जिल्ह्यालाही होणार आहे.
लॉकडाऊन 28 फेब्रुवारीपर्यंत वाढ
जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी सध्या सुरु असलेले लॉकडाऊन 28 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी श्री देसाई यांनी तसे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा पूर्णपणे रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. यामध्ये लोकांनी मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझरचा वापरही बंधनकारक केला आहे.
संपादन - धनाजी सुर्वे