
डॉ. पवार यांनी खासदार पवार यांना राजर्षी शाहू पंचखंडात्मक राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ, छत्रपती राजाराम महाराज व सेनापती संताजी घोरपडे यांच्यावर आधारित पुस्तके भेट दिली.
कोल्हापूर : कोल्हापूर ऐतिहासिक शहर असून इथली सांस्कृतिक संपदा महत्त्वपूर्ण आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विविधांगी कार्याचा कोल्हापूरला मोठा वारसा आहे. तो केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाला कळण्याकरिता त्याचे मार्केटिंग होणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी आज येथे व्यक्त केली.ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांची त्यांच्या सानेगुरुजी वसाहतीतील निवासस्थानी
खासदार सुळे यांनी आज सकाळी सदिच्छा भेट घेतली.
दीड तासांहून अधिक वेळ दोघांत विविध विषयांवर चर्चा झाली.
खासदार सुळे म्हणाल्या, "कोल्हापुरात मंदिरे, शाहूकालीन इमारती आहेत. ऐतिहासिक वारसा लाभलेली स्थळे कमी आहेत. कोल्हापूरचा इतिहास आजच्या पिढीला कळण्याची आवश्यकता आहे. प्रवासाच्या निमित्ताने परप्रांतीय कोल्हापुरात येत असतात. त्यांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करण्याकरिता योग्य पावले उचलावी लागतील. राजर्षी छत्रपती शाहू राजांनी विविधांगी कार्यातून कोल्हापूरच्या वैभवात मोलाची भर घातली. हे वैभव केवळ महाराष्ट्राला माहीत असून चालणार नाही ते देशाला समजण्यासाठी त्यादृष्टीने उपाय योजना आखाव्या लागतील.
त्या म्हणाल्या, "छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानवतावादी व धर्मनिरपेक्ष होते. हा वारसा शालेय विद्यार्थ्यांपर्यंत जाण्यासाठी घेऊन नेमके काय करावे लागेल, यासंदर्भात निर्णय घ्यावा लागेल. समाजाच्या प्रबोधनासाठी तो आवश्यक आहे."
डॉ. पवार यांनी खासदार पवार यांना राजर्षी शाहू पंचखंडात्मक राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ, छत्रपती राजाराम महाराज व सेनापती संताजी घोरपडे यांच्यावर आधारित पुस्तके भेट दिली. तत्पूर्वी, वसुधा पवार, डॉ. अरुंधती पवार, डॉ. मंजूश्री पवार, संयोगिता पवार यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी सुनील शिंदे, शाहीर आझाद नायकवडी उपस्थित होते.
हेही वाचा- राज्य शासनाचा निर्णय डावलून तेथे केंद्र शासनाने हस्तक्षेप करणे ही पद्धत योग्य नाही
यावेळी माजी महापौर सई खराडे, शिवतेज खराडे यांनी खासदार सुळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सानेगुरुजी शिक्षक सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्ष सुधा जरग व रमेश चौगुले यांनी त्यांना वसाहतीतील ओपन स्पेस क्रमांक तीनमध्ये संरक्षित भिंत व सांस्कृतिक सभागृह बांधण्याकरिता खासदार फंडातून निधी उपलब्ध करावा, या मागणीचे निवेदन दिले.
संपादन- अर्चना बनगे