कोल्हापूर: हेब्बाळमध्ये भाऊबंधात जमीन वादातून मारामारी 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 January 2021

संभाजी शिंदे व सुभाष शिंदे यांच्यात जमिनीच्या वाटणीवरून वाद आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्टही आहे

गडहिंग्लज : हेब्बाळ कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथे जमिनीच्या वादातून झालेल्या मारामारीत तिघे जखमी झाले आहेत. गुरुवारी (ता.21) व शुक्रवारी (ता.22) सकाळी ही घटना घडली. परस्परविरोधी फिर्यादीवरुन 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

संभाजी शिंदे व सुभाष शिंदे यांच्यात जमिनीच्या वाटणीवरून वाद आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. दरम्यान, संभाजी शिंदे यांचा तोडणी केलेला ऊस कारखान्याला पाठविताना सुभाष शिंदे यांनी अडवणूक केली. तसेच आज सकाळी संभाजी यांच्या शेतातील ऊस तोडला. त्याबाबत विचारणा केली असता लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. यात संभाजी शिंदे यांच्यासह कल्पना संभाजी शिंदे, प्रमोदिनी देसाई जखमी झाले आहेत. याबाबतची फिर्याद संभाजी शिंदे यांनी दिली आहे. सुभाष चंद्रकांत शिंदे, चंद्रकांत दिनकर शिंदे, विनायक सुभाष शिंदे, सुभाष दत्तात्रय शिंदे, सुधीर दत्तात्रय शिंदे, उमेश दिनकर शिंदे, वैष्णव विलास शिंदे, सुखदेव बाळाप्पा पोवाडे, विलास दत्तात्रय शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

विलास दत्तात्रय शिंदे यांच्या फिर्यादीनुसार संभाजी गोपाळ शिंदे, प्रवीण संभाजी शिंदे, कल्पना संभाजी शिंदे, प्रमोदनी देसाई, पिंटू नाईक, काशाप्पा कणगले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. जमिनीच्या कारणावरुन वाद असून आरोपींनी जमाव करून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.   

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hitting between two group kolhapur