पत्नीचा खून करून गेला मासे पकडायला; पण घडले भलतेच 

सचिन शिंदे,
बुधवार, 22 जानेवारी 2020

संशय किती वाईट असतो.. तो एखाद्याच्या जिवावरही बेततो. अनेकदा केवळ संशयावरून खुनाच्या घटना घडतात. सहा महिन्यांपूर्वी चारित्र्याच्या संशयावरून पहाटेच पत्नीचा खून झाल्याची घटना गोळेश्वर येथे घडली होती. पहाटे पत्नीची जीवनयात्रा संपवून पतीने पलायन केले. मात्र, पोलिसांनी पतीला अवघ्या १२ तासांत शोधून गजाआड केले.

संशय किती वाईट असतो.. तो एखाद्याच्या जिवावरही बेततो. अनेकदा केवळ संशयावरून खुनाच्या घटना घडतात. सहा महिन्यांपूर्वी चारित्र्याच्या संशयावरून पहाटेच पत्नीचा खून झाल्याची घटना गोळेश्वर येथे घडली होती. पहाटे पत्नीची जीवनयात्रा संपवून पतीने पलायन केले. मात्र, पोलिसांनी पतीला अवघ्या १२ तासांत शोधून गजाआड केले. खून कोणी केला, त्याचा काहीही पुरावा नव्हता. पती-पत्नीत वाद झाल्याचा एकमेव धागा हाती घेऊन पोलिसांनी तपास केला. त्यात फरारी पतीच्या मोबाईलच्या रेंजनेही पोलिसांना साथ दिली. परिस्थितीजन्य पुरावे व मोबाईलच्या रेंजवरून माग काढत तपासाचे आव्हान पोलिसांनी पेलले. पती कण्हेर धरणावर मासे पकडण्यात मग्न असतानाच पोलिसांनी मासे मारणाऱ्यांच्या वेशात तेथे छापा टाकून त्याला गजाआड केले. गोळेश्वर येथे झालेल्या खुनाचा तपास पोलिसांना आव्हानात्मक बनणार होता. पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतील परिस्थितीजन्य पुराव्यांमुळे खुनी पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

हे पण वाचा - वजन वाढविण्यासठी सप्लिमेंटस्‌ खाताय; मग ही बातमी एकदा वाचाच

संशय किती वाईट असतो, त्याचा अनुभव अनेकदा पोलिसांच्या तपासातून पुढे आला आहे. केवळ संशयावरून अनेकांनी केलेले गुन्हे त्यांच्यावर पश्‍चात्तापाची वेळ आणतात. संशयाची खात्री न करता अनेकदा गुन्हे होतात. सहा महिन्यांपूर्वी गोळेश्‍वर येथे खून झाला होता. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून पतीने केला होता. जून महिन्यातील ती घटना आहे. पावसाळ्याचे दिवस होते. नुकताच पावसाळा लागल्याने पाऊस कमी-जास्त होता. त्याचवेळी गोळेश्वरच्या कॉलनीतील एका घरात खुनाचा कट रचला जात होता. वडगाव हवेलीचे दांपत्य होते. मात्र, ते गोळेश्वरमध्ये राहात होते. वडगाव हवेली येथे त्याचे चिकन सेंटर होते. त्यावर त्यांची गुजराण चालू होती. मात्र, त्यांच्या संसारात संशयाची बीजे आली अन्‌ संसार बिघडला. वडगावपासून त्यांच्यात वाद होता. गोळेश्वरमध्येही तो व्हायचा. जूनच्या एका रात्रीत तो वाद इतका विकोपाला गेला की, पतीने पत्नीची जीवनयात्राच संपवली. त्या रात्री दोघांत कडाक्‍याचा वाद झाला. त्यानंतर ते झोपले. मात्र, ती पहाट उजाडली ती पत्नीच्या क्रूर हत्येने. पतीने झोपेतील पत्नीचा गळा आवळून व तोंडावर उशी दाबून तिची जीवनयात्रा संपवली. पहाटेच्या सौम्य अंधारात त्याच्याकडून कृत्य झाले. पत्नी मृत झाल्याची खात्री केल्यानंतर त्याने घराचा दरवाजा बंद करून तेथून पलायन केले होते. तो दुचाकीवरून पळून गेला. रोज पहाटे उठणारी शेजारीण आज का उठली नाही, म्हणून शेजारची महिला पाहायला आली व तिला धक्काच बसला. घराचा दरवाजा उघडाच होता. पलंगावर पत्नी निपचीत पडली होती. तिने घरच्यांना ती गोष्ट सांगितली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्या ठिकाणची पाहणी केली. महिलेचा खून झाला होता. मात्र, तो कोणी केला, कसा केला, त्यामागचे कारण काय, पती कोठे आहे, असे अनेक प्रश्न पोलिसांना सतावत होते. त्यावेळी पती-पत्नीत वाद होता, अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली व पोलिसांचा संशय पतीभोवती फिरू लागला. त्यावेळी त्याची दुचाकी गायब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी ती दुचाकी शोधून काढली. ती वडगाव हवेलीत त्याच्या जुन्या घराजवळ लावली होती. पहाटे संशयित येथे येऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

हे पण वाचा - पोलिसांनी लढविला नामी शक्कल; डिस्कच्या क्रमांकावरून आरोपी जाळ्यात

कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हा प्रकटीकरण विभागाचे तत्कालीन फौजदार भारत चंदनशिवे, हवालदार सतीश जाधव, नितीन येळवे यांनी तपासासाठी परिश्रम घेतले. जाधव, येळवे यांनी खबऱ्याव्दारे त्याचा मोबाईल क्रमांक मिळवला. त्यावरून त्याचा ट्रेस लावण्यास सुरवात केली. कऱ्हाड, वडगाव हवेली, सातारा व कण्हेर अशी त्याच्या रेंजची लोकेशन दिसू लागली. त्यानंतर तो फोन स्वीच ऑफ होता. शेवटची रेंज कण्हेरजवळ होती. त्यानंतर ती बंद झाली होती. घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी पत्नीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली. त्यावेळी श्वास गुदमरल्याने तिचा मृत्यू झाल्याचा अहवाल आला. त्यावेळी पत्नीचे नातेवाईकही पोलिस ठाण्यात आले होते. त्यांनी अधिक माहिती दिली. पोलिसांना कण्हेर येथे त्याचे पाहुणे आहेत, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी तपासाचा वेग वाढविला. तत्कालीन फौजदार चंदनशिवे, हवालदार जाधव, येळवे यांच्यासह काही कर्मचारी कण्हेर धरणाकडे गेले. मध्यरात्रीनंतर खुनाचा प्रकार घडला होता. त्यानंतर काही तासांतच तपासाची चक्रे फिरली होती. पती-पत्नीत वाद होता. मात्र, तरीही त्या दोघांनीही सामंजस्याची भूमिका घेतली होती, अशी माहिती पोलिसांच्या तपासात पुढे येत होती. 

हे पण वाचा - पैलवानांच्या मानधनाबाबत हात आखडता

संशय काही केल्या कमी झाला नव्हता, असेही काही लोक म्हणत होते. गोळेश्वरातील बापूजी साळुंखेनगरात भाड्याची खोली घेऊन ते राहत होते. खून झाला त्या रात्री पुन्हा चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला. रात्रीचा वाद विकोपाला गेला. त्यावेळी चिडलेल्या पतीने मध्यरात्रीनंतर रागाच्या भरात पत्नी झोपेत असतानाच तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तो तेथून पसार झाला. पोलिस माहिती व घटनाक्रम जुळवत होते. संशयित पतीला ताब्यात घेण्यासाठी तपासाची चक्रे फिरली. त्यावेळी तो कण्हेर धरण येथे गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. फौजदार चंदनशिवे, हवालदार जाधव, येळवे, मोरे यांचे पथक त्वरित तिकडे रवाना झाले. पती तेथे असल्याच्या माहितीची खात्री केली. त्याच्या पाहुण्यांकडे तपास केला त्यावेळी तो मासे मारण्यासाठी कण्हेर धरणावर गेल्याची 
माहिती मिळाली. पोलिसांनी त्याचवेळी वेशांतर केले. 
मासे मारणाऱ्यांच्या वेशात पोचलेल्या पोलिसांच्या हातात मासेमारीचे जाळे, गळ, माशाचे खाद्य असे साहित्य होते. बनियन व फाटकी विजारही कर्मचाऱ्यांनी घातली होती. संशयित जेथे मासे मारण्यासाठी बसला होता, तेथेच तीन पोलिस पोचले. त्यांनी संशयितांशी गप्पा मारत मासे मारण्याचे नाटक केले. त्याचवेळी संधी मिळताच त्याच्यावर छापा टाकून त्यास पकडले. प्रत्यक्ष घटानस्थळावर हवालदार जाधव व येळवे यांनी त्याला उडी मारून पकडले. त्याचवेळी फौजदार चंदनशिवे व त्यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. अवघ्या १२ तासांत पोलिसांनी खुनी पतीच्या हातात बेड्या ठोकल्या. परिस्थितीजन्य पुरव्यांच्या आधाराची साखळी जुळवत पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे आजही कौतुक होत आहे. 

खुनानंतर पार्टीत दंग 
पत्नी सोबतचा वाद विकोपाला गेल्यानेच तिचा खून केल्याची कबुली पतीने पोलिसांना पकडल्यानंतर दिली. खुनानंतर घरातून पसार झालेला पती पहिल्यांदा वडगाव हवेलीला गेला. तेथे दुचाकी लावल्यानंतर तो कऱ्हाडच्या बसस्थानकावरून एसटीने थेट कण्हेरला गेला होता. पोलिस तेथे पोचले, त्या वेळी पतीच्या नातेवाइकांनाही धक्का बसला. कऱ्हाडला काय करून आला आहे, याची जाणीवही त्याने कण्हेर येथील लोकांना करून दिली नव्हती. तो त्यांच्यात मिसळून पार्टी करणार होता. माशांची पार्टी करण्यासाठी तो धरणात मासे पकडण्यासाठी गेला असतानाच पोलिसांनी त्याला छापा टाकून अटक केली. त्या वेळीही पत्नीच्या खुनाबद्दल जराही दुःख त्याला नव्हते. पोलिस ठाण्यातही त्याने सगळ्या गुन्ह्यांची कबुली देतानाही तो थंड होता. त्यामुळे पोलिसही त्याच्या अशा वागण्याने चक्रावून गेले होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: husband killed wife in satara