इचलकरंजीत वस्त्रोद्योग शटडाऊन... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी; दररोज 8 ते 10 लाख मीटर कापड उत्पादन ठप्प... 

इचलकरंजी - कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील वस्त्रोद्योग व्यवसाय आजपासून शटडाऊन झाला आहे. अनेक यंत्रमागाची चक्रे ठप्प झाली असून कर्नाटक भागातून येणाऱ्या कामगारांनाही पंचगंगा नदी पुलावरच रोखण्यात येऊ लागले आहे. दरम्यान प्रोसेसमध्ये अडकलेले कापड तातडीने प्रक्रिया करून ते बाहेर काढण्यासाठी उद्योजकांची धावपळ सुरू झाली आहे. 

वस्त्रोद्योगाच्या शटडाऊनमुळे शहरात दररोज सुमारे 8 ते 10 लाख मिटर कापडाचे उत्पादन ठप्प होणार आहे. 70 ते 80 हजार कामगारांना येत्या 31 मार्चपर्यंत विनाकाम बसून रहावे लागणार आहे. कापडावर प्रक्रिया होणारे दररोजचे अडीच ते तीन लाख मिटर कापडाचे कामही यामुळे थंडावणार आहे. 
शहरात वस्त्रोद्योग व्यवसायात मोठ्या प्रमाणात कामगार काम करतात. हे कामगार महाराष्ट्र, कर्नाटकबरोबरच उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान या भागातूनही आले आहेत. एकूणच सध्याची संसर्गजन्य स्थिती पाहता वस्त्रोद्योग व्यावसायिकांनी तोटा झाला तरी एकूण परिस्थितीचे सामाजिक भान ठेवत कारखाने बंद करण्यास गेल्या शुक्रवारपासूनच सुरवात केली आहे. आज बहुतांश यंत्रमाग ठप्प झाले आहेत. काही ठिकाणी अपरिहार्य कारणास्तव यंत्रावर असणारे उत्पादन संपविण्यासाठी उद्योजक व कामगारांची धडपड सुरू होती. 

शहरात सुमारे सव्वा लाख यंत्रमाग असून दररोज 8 ते 10 लाख मिटर कापडाचे उत्पादन होते. हे उत्पादन यामुळे आता ठप्प होणार आहे. शहरातील उत्तरप्रदेश आणि बिहारमधील कामगार यापूर्वीच गावी परतले असून उर्वरीत कामगारही सध्या कामाविनाच येथे बसून आहेत. दरम्यान प्रोसेस उद्योगात अडकलेले कापड प्रक्रिया करण्यासाठी प्रोसेस चालकांची व कामगारांची धडपड सुरू आहे. लाखो मिटर कापड रासायनिक प्रक्रिया करून पाण्यात भिजवून ठेवले आहे. अशा कापडावर वेळीच प्रक्रिया होण्याची आवश्‍यकता आहे. या कापडावर उर्वरीत प्रक्रिया करण्यासाठी कामगारही सहकार्य करू लागले आहेत. यंत्रमाग व्यवसायाच्या एकूणच शटडाऊनमुळे शहरातील आर्थिक चक्रांनाही ब्रेक लागणार आहे. यामुळे येत्या दोन दिवसात आर्थिक उलाढालीवरही मोठा परिणाम होणार आहे. 

दृष्टीक्षेप 

  •  कर्नाटकातील कामगारांना येण्यास बंदी * यंत्रावरील उत्पादन संपविण्याची धडपड सुरू 
  •  70 ते 80 हजार कामगार बेरोजगार 
  •  वस्त्रनगरीचा आर्थिक कणा कोलमडणार 
  •  उद्योजक, कामगारांकडून बंदला प्रतिसाद  
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ichalkaranjeet Textile Shutdown