इचलकरंजीत 66 टक्के वाहनधारकांनी अद्याप दंड भरलाच नाही

ऋषीकेश राऊत
Saturday, 7 November 2020

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक शाखा कारवाई करत असते. चालू वर्षात शहर वाहतूक शाखेने जोरदार कारवाई करत वाहतुकीस शिस्त आणण्याचा प्रयत्न केला. मात्र कारवाईची दंडात्मक वसुली वाहतूक शाखेची डोकेदुखी बनली आहे.

इचलकरंजी : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक शाखा कारवाई करत असते. चालू वर्षात शहर वाहतूक शाखेने जोरदार कारवाई करत वाहतुकीस शिस्त आणण्याचा प्रयत्न केला. मात्र कारवाईची दंडात्मक वसुली वाहतूक शाखेची डोकेदुखी बनली आहे. वर्षभरात एकूण कारवाईपैकी 33 टक्के दंड वसूल केला आहे; तर 66 टक्के दंडाची रक्कम अद्याप वाहनधारकांकडेच आहे. या वर्षी कारवाईचे प्रमाण अधिक असल्याने अनपेड दंड वसुलीचे वाहतूक शाखेसमोर आव्हान आहे.

चालू वर्षात जानेवारीपासून आजअखेर 35 हजार वाहनधारकांवर वाहतूक शाखेने कारवाई केली. ई चलन व सीसीटीव्हीद्वारे ही कारवाई केली. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी प्रत्यक्ष ई चलनद्वारे वाहनांवर कारवाई करून दंडात्मक कारवाई केली. ई चलनद्वारेच कारवाईचे प्रमाण अधिक आहे.

पोलिसांना चकवा देत कारवाईतून सुटणाऱ्या वाहनधारकांवर डिव्हाईस मशिनद्वारे कारवाई केली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून होणाऱ्या कारवाईच्या दंडासाठी संबंधित वाहनधारकांना मोबाईलवर मेसेज जातो. अशा सर्व प्रकारच्या माध्यमातून होणाऱ्या कारवाईतून ठोठावलेला दंडही वसूल होणे अपेक्षित असते; मात्र वर्षभरातील केवळ 26 लाख 64 हजार 600 इतका 33 टक्के दंडच वसूल करण्यात वाहतूक शाखेला यश आले आहे. 

कोरोनाच्या लॉकडाउनमुळे मिळालेल्या कालावधीचा सदुपयोग करत अनपेड दंड वसुलीची मोहीम वाहतूक शाखेने राबवली; मात्र सर्व सुरळीत झाल्यानंतर ही मोहीम थंडावली. कारवाई केलेले अद्याप 23 हजार 950 वाहनधारकांना दंड भरण्यास जाग आली नाही. वर्ष संपण्यास दोन महिन्यांचा अवधी असताना दंड वसुलीचा हा डोंगर वाहतूक शाखेसमोर आव्हानात्मक असणार आहे. 

गतवर्षीच्या तुलनेत तिप्पट कारवाई 
गतवर्षी 12 हजार वाहनधारकांवर कारवाई करून 29 हजाराचा दंड ठोठावला होता. या वर्षी मात्र ऑक्‍टोबरअखेर 35 हजार वाहनधारकांवर कारवाई केली. 81 लाख 74 हजारांचा दंडही ठोठावला. यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत कारवाईचे प्रमाण तिप्पट आहे. 

अनपेड वाहनधारकांच्या घरी नोटिसा 
या वर्षी मोठ्या प्रमाणात कारवाई होऊनही दंड न भरण्याकडे पाठ फिरवलेल्या वाहनधारकांची संख्या 23 हजार 950 आहे. यामुळे अशा वाहनधारकांना दंड भरण्याच्या नोटिसा थेट घरी पाठवल्या आहेत. नोटिसा देऊनही दंड न भरणाऱ्या वाहनधारकांची वाहने जप्त केली जातील, असे वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी सांगितले. 

- एकूण कारवाई - 35 हजार 04 
- एकूण दंड - 81 लाख 74 हजार 308 
- पेड - 26 लाख 64 हजार 600 
- अनपेड - 54 लाख 39 हजार 700 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Ichalkaranji, 66 Percent Vehicle Owners Have Not Yet Paid The Fine Kolhapur Marathi News