इचलकरंजीतील सर्व व्यवहार बंद, नागरिक बसले घरीच 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जुलै 2020

ग्रामीण भागातील शहराला जोडणारे मार्ग ओस पडले आहेत. शहरातून इतर ठिकाणी रोजगाराच्या निमित्ताने जाणारे किरकोळ नागरिक तसेच दुधवाले वगळता अनेकांनी शहरात येण्याचे टाळले.

इचलकरंजी : ग्रामीण भागातील शहराला जोडणारे मार्ग ओस पडले आहेत. शहरातून इतर ठिकाणी रोजगाराच्या निमित्ताने जाणारे किरकोळ नागरिक तसेच दुधवाले वगळता अनेकांनी शहरात येण्याचे टाळले. त्यामुळे शहरात येणाऱ्या मार्गांवरील वर्दळ कमी राहिली. कोरोनामुळे 22 मार्च रोजीच्या जनता कर्फ्यू आणि आता या कडक लॉकडाउनमुळे ग्रामीण भागातील मार्ग दुसऱ्यांदा निर्मनुष्य झाले आहेत. 

इचलकरंजी शहरात 14 जुलैपर्यंत कडक लॉकडाउन केला आहे. काही अपवाद वगळता शहराच्या सर्व सीमा ये-जा करण्यासाठी बंद आहेत. बंद काळात 10 व 14 जुलैला सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंतच किराणा माल, भाजीपाला व जीवनावश्‍यक साहित्यांच्या खरेदीसाठी मुभा दिली आहे. त्यामुळे नियमीत शहरात भाजीपाला विक्रीसाठी येणारे शेतकरी व्यापाऱ्यांवर मर्यादा आली. शिवाय शहरातील व्यवसाय बंद ठेवल्याने तेथे काम करणाऱ्या नागरिकांना घरीच बसावे लागले. यामुळे नियमित शहरात येणाऱ्यांची संख्या कमीच झाली. 

शहरातून इतर ठिकाणी रोजगार व अत्यावश्‍यक कामासाठी जाणाऱ्या नागरिकांची वर्दळ काही प्रमाणात दिसून आली. अशांना लायसन्स, कागदपत्रे व कामाची खातरजमा करून तपासून शहरात प्रवेश दिला जात होता. सकाळच्या सत्रात दुध विक्रेत्यांची लगबग होती. सकाळी 6 ते 9 या वेळेत दुध विक्री घरपोच करण्यासाठी मुभा दिली आहे. ग्रामीण भागातून शेकडो दुधवाल्यांचे शहरात नियमीत दुधाचे ग्राहक आहेत. या कालावधीत दुध विक्रेत्यांची वर्दळ सोडल्यास दिवसभर शहराला जोडणारे ग्रामीण भागातील मार्ग निर्मनुष्य होते. 

दुध विक्रेत्यांची तारांबळ 
दुध विक्रेते नियमित सकाळच्या सत्रात जास्तीत जास्त 11 वाजेयर्पंत दुध ग्राहकांपर्यंत पोचवत असत. मात्र कडक लॉकडाउनमुळे दुध विक्रीला सकाळी 6 ते 9 या वेळेत सवलत दिली आहे. त्यामुळे दुधवाल्यांचे नेहमीचे नियोजन कोलमडले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून उपलब्ध होईल तसे दुध ग्राहकांपर्यंत पोहचवले. अशा परिस्थितीत दुध विक्रेत्यांना दुध गोळा करता आले नाही. आणि सुरळीतपणे ग्राहकांपर्यंत पोहचवताही आले नाही. तसेच शहरात नियमीत येणारे विविध कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्याही विक्रीसाठी आल्या नाहीत. 

दृष्टिक्षेप
- इचलकरंजीत 14 जुलैपर्यंत कडक लॉकडाउन 
- इचलकरंजीत ये-जा करणाऱ्या सर्व सीमा बंद 
- इचलकरंजीत येणाऱ्या मार्गावरील वर्दळ कमी 
- सकाळच्या सत्रात दुध विक्रेत्यांचे नियोजन कोलमडले 

कोल्हापूर

कोल्हापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ichalkaranji are closed, citizens stay at home