इचलकरंजीत गव्याची एंट्री : परिसरात झाले नागरीकांना दर्शन 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 January 2021

नाईक मळा, शाहूनगर परिसर, हेरलगे मळा येथे नागरीकांना झाले दर्शन 

इचलकरंजी (कोल्हापूर)  : गेल्या काही दिवसांपासून वारंवार गव्याच्या दर्शनाने हातकणंगले तालुक्‍यातील कांही गावातील शेतकरी भितीच्या छायेने व्याकूळ झाला आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास इचलकरंजी शहरातील दाट लोकवस्तीच्या नजीक नाईक मळा, शाहूनगर परिसर, हेरलगे मळा अशा ठिकाणी नागरिकांना गव्याचे दर्शन झाले. याबाबतची माहिती तात्काळ वन विभागाला कळविण्यात आली. 

काही दिवसांपूर्वी कोरोची येथे प्रथम गव्याचे दर्शन झाले. त्यानंतर वन विभागासह स्थानिक रेस्क्‍यू टिमने सतर्क होऊन या भागात विशेष लक्ष ठेवले. रात्रीची गस्त वाढवून गव्याच्या पाऊलखुणांची चाचपणी करत गव्यांचा शोध घेण्याचे काम सुरूच होते. या कालावधीत किणी येथे गव्याचे दर्शन झाले. चंदूर भागातही गवा आढळल्याच्या अफवा होत्या. रविवारी सायंकाळच्या सुमारास पुन्हा एकदा इचलकरंजी नजीक नागरिकांना गव्याचे दर्शन झाले. काही दिवसांपासून गव्याच्या दर्शनाने भयभीत झालेले नागरिक अधिकच धास्तावले आहेत. 

वन विभागाकडून मिळालेली माहिती अशी,

कोरोची ते चंदूर या परिसरात काही दिवसांपासून एक गवा तळ ठोकून आहे. दिवसभर निर्मानुष्य असलेल्या शेती क्षेत्रात हा गवा वास्तव्यास असतो. मात्र सायंकाळ झाली की चाऱ्याच्या शोधात हा गवा बाहेर पडत आहे. काही दिवसांपासून कबनूर ओढ्यामार्गे चंदूर परिसरात या गव्याच्या पायांचे ठसे रेस्क्‍यू टिमला मिळाले आहेत. 

वन विभागाचे नागरिकांना आवाहन 
पोटासाठी अन्न शोधत जंगलातून बाहेर पडलेला गवा आता नागरी वस्तीत शिरकाव करू लागला आहे. गव्याचे दर्शन झाल्यानंतर नागरिकांनी कळपाने गव्याच्या पाठीमागे न लागता निर्माण होणारा गोगांट टाळावा. जास्त लोकवस्तीच्या ठिकाणी गव्याचे दर्शन झाल्यास त्वरीत वन विभाग व स्थानिक रेस्क्‍यू टिमशी संपर्क साधावा.  

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ichalkaranji bison see from people