इचलकरंजी नगरपालिकेत खळबळ ; ४५ नगरसेवक-सेविकांना दंडाची नोटीस

पंडित कोंडेकर
Monday, 21 September 2020

पालिका प्रशासनाकडून सभेला उपस्थीत असलेल्या नगराध्यक्षांसह 45 नगरसेवक-नगरसेविकांना दंडाच्या नोटीसा पाठविल्या आहेत.

इचलकरंजी : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी पालिकेने ऑनलाईन सर्वसाधारण सभा आयोजीत केली होती. मात्र तांत्रीक दोष निर्माण झाल्यामुळे ही सभा ऑफलाईन झाली. यावेळी सोशल डिस्टन्सींग पाळण्यात आले नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून सभेला उपस्थीत असलेल्या नगराध्यक्षांसह 45 नगरसेवक-नगरसेविकांना दोनशे रुपये दंडाच्या नोटीसा पाठविल्या आहेत. त्यामुळे पालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - जिल्ह्यातील गटसचिवांनाही हवे विमा कवच : हसन मुश्रीफ 

 

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर तब्बल सहा महिन्याच्या खंडानंतर पालिका प्रशासनाने ऑनलाईन सर्वसाधारण सभा 16 सप्टेंबर रोजी आयोजीत करण्यात आली होती. मात्र या सभेवेळी तांत्रीक त्रुटी निर्माण झाल्यामुळे नाट्यगृहातील एका रुममध्ये सत्तारुढ व विरोधक एकत्र येवून पालिका सभा पार पाडली. मात्र यावेळी सोशल डिस्टन्सींगचा पूर्णतः फज्जा उडाला होता. याबाबत सोशल मिडियातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यामुळे नगरसेवकांवर प्रशासन कारवाई करणार काय, याकडे लक्ष लागले होते.

दरम्यान, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सभेला उपस्थीत असलेल्या 45 नगरसेवक-नगरसेविकांना प्रत्येकी दोनशे रुपये दंडात्मक कारवाईच्या नोटीसा लागू केल्या आहेत. यामध्ये नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्षा तानाजी पोवार, जेष्ठ नगरसेवक अजितमामा जाधव, शशांक बावचकर, पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांच्यासह प्रमुख पदाधिकार्‍यांचा समावेश आहे. या प्रकारामुळे पालिकेत खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - विज्ञान निर्भयता नीती नसे कशाचीही भीती: सूर्यग्रहणात गर्भवतीने चिरली भाजी, तिनेच दिला सदृढ बाळाला जन्म

 

मुख्याधिकार्‍यांसह नगरसेवकांनी भरला दंड

पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे, नगरसेवक शशांक बावचकर यांच्यासह काही नगरसेवकांनी तातडीने दंडाची रक्कम पालिकेकडे जमा केली आहे. तर स्वतः मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनीही दंडात्मक रक्कम पालिकेकडे भरली आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ichalkaranji city council fine to 45 corporator cause social distance not run with rules