यंदाचा गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक, देखाव्याविनाच...

लुमाकांत नलवडे 
मंगळवार, 30 जून 2020

गणेशोत्सवातील आमगन आणि विसर्जन मिरवणूकच असणार नाहीत, त्यामुळे गणेश मंडळांनी परिस्थितीचे भान ठेवून पोलिसांना सहकार्य करावे.

कोल्हापूर : गणेशोत्सवातील आमगन आणि विसर्जन मिरवणूकच असणार नाहीत, त्यामुळे गणेश मंडळांनी परिस्थितीचे भान ठेवून पोलिसांना सहकार्य करावे. राज्य शासनाकडून येणाऱ्या नियमांचे पालन करावे, हीच पोलिसांची भूमिका आहे, गणेशोत्सव मंडळ आणि पोलिसांतील समन्वयासाठी पोलिस उपअधीक्षकांकडून लवकरच बैठकांचे आयोजन केले जाईल, असेही विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांनी आज "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

शहरातील गणेशोत्सव मंडळांच्या प्रमुखांनी त्यांची मते काल "सकाळ'कडे "सिटिझिन एडीटर'च्या माध्यमातून नोंदविली. त्याबाबत आज विशेष पोलिस महानिरीक्षक वारके यांच्याशी संवाद साधला. मंडळांच्या प्रमुखांचे मुद्दे त्यांच्यापर्यंत पोचविले. 

यावेळी वारके म्हणाले,""गणेशोत्सवाबाबतचा ग्राऊंड रिपोर्ट शासनाकडे पाठविला आहे. गणेशमुर्तींची उंची, देखावे, मिरवणुका याचा ठोस निर्णय राज्य शासन घेईल. त्यानंतर त्यांची अंमलबजावणी करण्याचे काम पोलिसांकडून होईल. मात्र "ग्राऊंड रिपोर्ट'वरून मिळालेल्या माहितीच्या आधारे कोरोनाच्या महामारीतून आपण जात आहोत. त्यामुळे साध्या पद्धतीने गणेशोत्सव करावा, असे पोलिसांचे आवाहन आहे. पोलिसांकडून मंडळांना दिलेल्या जाणाऱ्या सुचनांचे पालन सर्वांच्या हितासाठी आहे. त्याचा गैरअर्थ कोणी काढू नये. वाहतुकीस अडथळा होणार नाही. असे मंडप असावेत, अशी भूमिका गेल्यावर्षीही घेतली होती. आता ती कायम आहे. तसेच कोरोनाच्या महामारीत राज्य शासनाकडून जे आदेश येतील, त्याचे तंतोतंत पालन करावेच लागेल. त्यासाठी पोलिस कटीबद्ध आहेत.'' 

गणेशोत्सवात नेमके नियम काय असतील? याबाबत अद्यापही मंडळांचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत, याबाबत वारके म्हणाले,""आगमन आणि विसर्जन मिरवणूक असणार नाही. तसेच देखावेही होणार नाहीत, असे असेल तर यंदा मंडळांनीही साधेपणाने, छोटी मूर्ती घेऊन गणेशोत्सव साधेपाणाने करावा, अशी भूमिका आहे. राज्य शासनाने यात काही बदल केल्यास त्या पद्धतीने मंडळांनी गणेशोत्सव साजरा करावा. कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी पोलिसांकडून दक्षता घेतली जात आहे.

कार्यकर्त्यांना सुचना दिल्या जात आहेत. पोलिस जनतेच्या भल्यासाठीच निर्णय घेत आहेत. याचाही विचार मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सव साजरा करताना करावा, एवढीच अपेक्षा आहे.'' 

डॉ. सुहास वारके म्हणतात... 

- शासनाचे आदेश येतील, त्याचे पालन करावे, हीच भूमिका 
- मंडळांची संभ्रमावस्था दूर करण्यासाठी लवकरच बैठक 
- गणेशोत्सवाबाबतचा ग्राऊंड रिपोर्ट शासनाकडे 
- सुचनांचे पालन, हे सर्वांच्याच हिताचे 
- गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: immersion procession, scenes banned ...