भादवण पंचक्रोशीत समूह संसर्गाचा वाढता धोका, आजऱ्याची वाटचाल शंभरीकडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जुलै 2020

आजरा तालुक्‍यात कोरोनाची वाटचाल शंभरीकडे आहे. आजअखेरीस 92 रुग्णांची नोंद झाली. सध्या भादवण पंचक्रोशीमध्ये स्थानिक नागरिकांना समूह संसर्गाचा धोका तयार झाला आहे.

आजरा : आजरा तालुक्‍यात कोरोनाची वाटचाल शंभरीकडे आहे. आजअखेरीस 92 रुग्णांची नोंद झाली. सध्या भादवण पंचक्रोशीमध्ये स्थानिक नागरिकांना समूह संसर्गाचा धोका तयार झाला आहे. मे महिन्यात मुंबई, पुणे येथून आलेल्या चाकरमान्यांमुळे कोरोनाचा शिरकाव झाला. सध्या कोरोनाचा प्रभाव वाढत असून, आता स्थानिक नागरिकही कोरोनाच्या विळख्यात येत आहेत.

भादवण पंचक्रोशीमध्ये कोरोनाचे पाच रुग्ण नव्याने आढळले. त्यापूर्वी दोन दिवस अगोदर तीन रुग्ण सापडले होते. यापैकी स्थानिक चौघे जण खासगी डॉक्‍टरांच्या संपर्कात आल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या पत्नीला कोरोना झाला होता. त्यामुळे येथे समूह संसर्गाला सुरवात झाली आहे. संबंधित डॉक्‍टरांच्या संपर्कात आलेल्या 108 जणांचे स्वॅब घेऊन त्यांना क्वारंटाईन केले आहे.

त्यापैकी काही जणांचे अहवाल येणे आहेत. त्यामुळे हा परिसर कोरोनाचा "हॉट स्पॉट' बनला आहे. सध्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 92 पर्यंत पोहचली आहे. आतापर्यंत 75 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना घरी पाठवले आहे. दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. उरलेल्या पंधरा जणांवर जिल्हा रुग्णालय व आजऱ्यातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. 

त्या सहा गावांवर लक्ष 
भादवण येथील खासगी डॉक्‍टरांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती या भादवण, भादवणवाडी, मासेवाडी, जाधेवाडी, हाजगोळी, पेद्रेवाडी येथील आहेत. त्यामुळे त्यांच्यावर प्रशासनाने लक्ष ठेवले आहे. गावात आरोग्य विभागाकडून कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increased Risk Of Bhadvan Area Group Infection Kolhapur Marathi News