बाधित पोलिसांसाठी कोल्हापुरात स्वतंत्र कोविड सेंटर....

राजेश मोरे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

रस्त्यावर उतरून बंदोबस्त करताना पोलिसांचा नागरिकांशी वारंवार संपर्क येत आहे.

कोल्हापूर - कोरोनाच्या संकटकाळात अव्याहतपणे कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ लागला आहे. त्यांच्यासाठी हातकणंगले येथे स्वतंत्र कोविड सेंटर उभारले आहे. तेथे बाधित पोलिसांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली जात आहे. आतापर्यंत १२ पोलिसांनी कोरोनावर मात केल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.
कोरोनाच्या संकटात चार महिन्यांपासून पोलिस दल अव्याहतपणे राबत आहे. रस्त्यावर उतरून बंदोबस्त करताना पोलिसांचा नागरिकांशी वारंवार संपर्क येत आहे. परिणामी जिल्ह्यातील ४० पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. त्यांच्यासाठी हातकणंगले येथील घोडावत इन्स्टिट्यूट येथे स्वतंत्र कोविड सेंटर उभारले आहे. येथे अतिशय चांगल्या प्रकारे बाधित पोलिसांची काळजी घेऊन त्यांना आवश्‍यक त्या सुविधा पुरविल्या जात आहे. त्या सर्वांची प्रकृती चांगली आहे. आतापर्यंत १२ पोलिसांनी कोरोनावर मातही केली असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

वाचा - असा होणार विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण... 

घ्या काळजी...

पोलिस कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावताना अनावश्‍यक वस्तूंचा स्पर्श टाळावा. कागदपत्रे हाताळताना आवश्‍यक ती काळजी घ्यावी. फेस शिल्ड, मास्क, सॅनिटायझरचा वापर नियमित करावा. ५५ वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शक्‍यतो ऑफिसवर्क द्यावे. मधुमेह, रक्तदाब असणाऱ्यांनी रक्तातील ऑक्‍सिजनचे प्रमाण किमान दोनदा तपासावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी केले.

संपादन - मतीन शेख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Independent Covid Center in Kolhapur for Corona affected police