
जिल्हा आदिवासी घटक योजनेंतर्गत अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानावर 2 दुधाळ जनावरांचा गट वाटप केला जाणार आहे
कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत 2020-21 मध्ये जिल्हा आदिवासी घटक योजनेंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी दिली आहे. गरजू लाभार्थ्यांनी त्यांचे अर्ज 10 फेब्रुवारीपर्यंत पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहनही जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
जिल्हा आदिवासी घटक योजनेंतर्गत अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानावर 2 दुधाळ जनावरांचा गट वाटप केला जाणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना असून यासाठी 63 हजार 796 रूपये अनुदान देण्यात आले आहे.
जिल्हा आदिवासी घटक योजनेंतर्गत अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानावर 10अधिक 1 शेळी गट वाटप केली जाणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना असून यासाठी 53 हजार 429 रूपये अनुदान आहे.
हे पण वाचा - एका फाउंड्री उद्योगातील फर्नेस भट्टीचा अचानक ब्लास्ट झाला
जिल्हा आदिवासी घटक योजनेंतर्गत कार्यक्रमांतर्गत अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना 1 हजार मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाव्दारे कुक्कुट पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना 1 लाख 68 हजार 750 रूपये अनुदान आहे. सर्व योजनांचे अर्ज नमुना पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती स्तरावर उपलब्ध आहेत.
संपादन - धनाजी सुर्वे