तुम्ही प्लाझ्मा देण्यास पुढे या अन् कोरोनाग्रस्त बरे करा...

शिवाजी यादव
रविवार, 12 जुलै 2020

सीपीआर रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी वापरली जाणार...

कोल्हापूर - दिवसागणिक वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येवर उपचार करताना भविष्यात औषधे कमी पडण्याची शक्‍यता गृहीत धरून सीपीआर रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी वापरली जाणार आहे. त्यासाठी कोरोनामुक्त झालेल्यांनी प्लाझ्मा देण्यास पुढाकार घेतला तरच भविष्यात कोरोनाग्रस्त बरे होतील, अशी अपेक्षा राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे यांनी व्यक्त केली.

प्लाझ्माचा वापर...

प्रत्येक कोरोनाग्रस्तावर सक्षम उपचार होतात. यातून कोरोना बरा होण्याचे प्रमाण लक्षवेधी आहे. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता  मोजक्‍या औषधांचा तुटवडा जाणवू शकतो. कोरोनावर निश्‍चित औषध नाही, तरीही पर्याय म्हणून कोरोनाग्रस्त व्यक्ती औषधोपचाराने पूर्ण बऱ्या झाल्या आहेत, त्यांचा प्लाझ्मा घेऊन अन्य व्यक्तींचा मध्यम व तीव्र स्वरूपाचा कोरोना बरा करण्यासाठी वापरला जातो. त्यासाठी कोरोनामुक्त व्यक्तींनी प्लाझ्मा देण्यासाठी पुढे येणे अपेक्षित आहे, असेही डॉ. घोरपडे यांनी सांगितले.

डॉ.पवन खोत म्हणाले, ‘‘प्लाझ्मा थेरपीही कोरोनाग्रस्तांची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी प्रभावी ठरत आहे. जे रुग्ण कोरोनामुक्त झालेत अशांच्या रक्तातील प्लाझ्मा काढला जातो, तो प्लाझ्मा (ॲन्टीबॉडीज) मध्यम ते तीव्र लक्षणे असलेल्या कोरोनाग्रस्ताला दिला जातो. त्यानंतर कोरोनाग्रस्तांची रोगप्रतिकारशक्ती वाढते. जे पॉझिटिव्ह होते ते निगेटिव्ह झालेत त्यांच्याच रक्तातील ॲन्टीबॉडीज या अधिक कार्यक्षमतेने कोरोनावर मात करू शकतात.’’

एका व्यक्तीकडून घेतलेल्या प्लाझ्माचा ३ ते ४ कोरोनाग्रस्तांना बरा करण्यासाठी लाभ होतो. त्यामुळे प्लाझ्मा दान केल्यास कोरोना उपचार प्रभावी करण्यासाठी आणखी मदत होऊ शकते, असेही डॉ. खोत यांनी सांगितले.

वाचा - धक्कादायक : ट्रॅकिंगला चकवा देत कोल्हापुरात अशी होतेय परजिल्ह्यातून इंन्ट्री...

हिमेटोलॉजिस्ट डॉ. वरुण बाफना, फिजियशियन डॉ. विजय बर्गे, डॉ. गिरीश पाटील, पॅथॅलॉजिस्ट डॉ. राम टेके, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. पवन खोत, तर समुपदेशक माहेश्‍वरी पुजारी, विजय कोळी, सलमान मुजावर, सत्यजित देसाई, अम्रपाली रोहिदास, दिलीप चव्हाण आदी प्लाझ्मा संकलनाविषयी जागृती घडवत आहेत.
 

कोरोनावर मात करण्यासाठी...

 

  •   पर्याय म्हणून प्लाझ्मा थेरपी संजीवनी
  •   प्लाझ्मा दिल्यास थकवा जाणवत नाही
  •   १ ते २ तासात प्लाझ्मा संकलित
  •   शंकाचे निरसन करून प्लाझ्मा थेरपी
  •   मनोबल वाढविण्यासाठी समुपदेशन
  •   उच्चशिक्षितांसह सामान्यांचेही प्लाझ्मा दान

 

संपादन - मतीन शेख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the initiative to donate plasma in cpr kolhapur