कोरोना रोखण्यासाठी बिंदू चौक कारागृहातून कैदी हलविणार

सुधाक काशीद : सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 28 एप्रिल 2020

नवीन येणाऱ्या एखाद्या कैद्यामुळे चुकून कोरोना संसर्ग होऊ नये व त्यामुळे साधारण 2300 कैदी असलेल्या कळंबा कारागृहाचे व्यवस्थापन ढासळू नये, म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे.

कोल्हापूर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी बिंदू चौक कारागृह रिकामे करण्यात येणार असून तेथील सर्व कैद्यांना कळंबा मध्यवर्ती कारागृहात हलविले जाणार आहे. बिंदू चौक कारागृहाचे रूपांतर बाहेरुन नवीन येणाऱ्या सर्व कच्च्या कैद्यांसाठी क्वारंटाईन कारागृहात केले जाणार आहे. नवीन येणाऱ्या एखाद्या कैद्यामुळे चुकून कोरोना संसर्ग होऊ नये व त्यामुळे साधारण 2300 कैदी असलेल्या कळंबा कारागृहाचे व्यवस्थापन ढासळू नये, म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात बिंदू चौकातील सर्व कैदी कळंबा कारागृहात हलविले जातील. 

सध्या कळंबा कारागृहात 2300 कच्चे व शिक्षा झालेले कैदी आहेत. बिंदू चौक कारागृहात 148 कैदी आहेत. सध्या नवीन कैद्यांना कळंबा कारागृहातच वेगळ्या वॉर्डमध्ये ठेवले जात होते; पण तरीही चुकूनही संसर्गाचा धोका नको म्हणून कळंबा कारागृहात बाह्य संपर्कातील कोणताही नवा कैदी ठेवून घेतला जाणार नाही. बिंदू चौकातीली कैदी तेथे आणल्यानंतर खऱ्या अर्थाने कळंबा कारागृह पूर्ण लॉकडाऊन होणार आहे. 

सध्या कळंबा व बिंदू चौक या दोन्ही कारागृहातील कैद्यांच्या नातेवाईकांच्या भेटी बंद आहेत. एरव्ही आठवडा व 15 दिवसांनी कैदी व त्यांच्या नातेवाईकांना न्यायालयीन कक्षात सुरक्षित अंतरावरून, इंटर कॉमवरुन संभाषण करत भेटता येत होते. याशिवाय न्यायालीन कामकाजासाठीही कैद्यांना बाहेर नेणे बंद करण्यात आले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महत्त्वाच्या सुनावण्या होत आहेत. याशिवाय सर्व कैद्यांच्या तोंडाला मास्क सक्तीचा असून मोठ्या कारागृहातील ज्येष्ठ कर्मचारीही सलग 15 दिवस कारागृहात ड्यूटी व त्यानंतर सलग 15 दिवस होम क्वारंटाईन अशा स्वरुपाची ड्यूटी करत आहेत. 

आता बिंदू चौंक कारागृह रिकामे करून तेथे फक्त नवे कैदीच ठेवण्यात येणार असल्याचे संसर्गाचा धोका कायम होणार आहे. कारण कारागृहात संसर्गित रुग्ण कैदी आला तर कारागृहाचे व्यवस्थापनच कोसळणार आहे. यामुळे खबरदारी घेतली जात आहे. 

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कैद्यांच्या आहारात काही बदल करण्यात आले आहेत. शंभर मिलीलिटर दूध हळद घालून दिले जात आहे. पालेभाज्यांचा अधिकाधिक वापर केला जात आहे. कैदी व त्यांच्या नातेवाईकांची समोरासमोर भेट बंद झाली तरी प्रत्येक कैद्याला त्यांच्या घरी ठराविक दिवसांनी कारागृहातील कॉईन बॉक्‍सवरून फोन करण्याची सुविधा देण्यात आली आहे. 
- शरद शेळके, कारागृह अधीक्षक 

अशी आहे व्यवस्था
2325 : कळंबा कारागृह कैदी संख्या 
148 : बिंदू चौक कैदी संख्या 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inmates will move the from Bindu Chowk jail to stop Corona Kolhapur Marathi News