
निपाणी : बीएसएनएलची इंटरनेट सेवा काल शनिवारीदुपारी चार वाजल्यापासून खंडित झाली आहे. बेळगाव, संकेश्वर आणि परिसरात केबल तुटल्याने कार्यालयीन कामांचा दोन दिवस खोळंबा झाला. आज सायंकाळी पाच वाजता सेवा सुरळीत झाली. तोपर्यंत विविध कार्यालयासह इंटरनेटवरील सर्व कामकाज थांबले होते. याबाबत वारंवार अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही लवकर दुरुस्ती न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
ऑनलाईनच्या जमान्यात नागरिकांना हायस्पीड इंटरनेट देण्याचा दावा बीएसएनएलने केला होता. त्या आमिषाला बळी पडून अनेक जणांनी बीएसएनएलचे इंटरनेट कनेक्शन घेतले. गेल्या काही महिन्यापासून इंटरनेटचे स्पीड कमी झाले. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांकडून त्याच्या तक्रारी वाढत आहेत. विशेषतः ग्राहकांनी रक्कम भरूनही रेंज मिळत नसल्याने अर्धवट रिंग अथवा कॉल कट होत आहे. पुन्हा आर्थिक भुर्दंड मात्र बसत आहे. त्यामुळे निपाणीसह परिसरात '४ - जी' नावालाच, '२ - जी'चा आधार, अशी अवस्था निर्माण झाली आहे.
गतिमान प्रशासनासाठी ऑनलाईनवर भर आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिक आणि शासकीय कार्यालयात बीएसएनएल इंटरनेटचा वापर वाढला आहे. शाळा, महाविद्यालये, बॅंका, नगरपालिका, शासकीय कार्यालये, खासगी संस्था बीएसएनएलच्या इंटरनेटच्या मदतीने ऑनलाईन कामे करत आहेत. पण त्यांना पुरेसा इंटरनेटचा स्पीड मिळत नसल्याने कामाचा खोळंबा होत आहे. अचानक नेटवर्क जाणे, मध्येच संवाद तुटणे, आवाज खरकरणे, इंटरनेट स्लो होणे अथवा बंद पडणे अशा अनेक तक्रारी आहेत.
तक्रार नोंदवली गेल्यास काही तासांमध्ये सेवा पूर्ववत सुरू होईल, असे सांगितले जाते. पण तक्रारीचे निवारण होत नसल्याने आर्थिक भुर्दंड सोसण्यापलीकडे पर्याय उरलेला नाही. अशातच भर म्हणून केबल तुटल्याने दोन दिवस त्रास सोसावा लागला. त्यामुळे सेवा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
"शनिवारी दुपारनंतर बेळगाव व संकेश्वर परिसरातील बीएसएनएल सेवा केबल तुटल्याने नादुरुस्त झाली. संबंधित ठिकाणाचा शोध घेऊन दुरुस्तीनंतर रविवारी सायंकाळी सेवा सुरू झाली आहे."
- श्री. पोवार, विभागीय अधिकारी, बीएसएनएल, निपाणी
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.