
जयसिंगपूर शहरातील शिक्षिकेला कोरोनाची लागण झाल्यानंतर इतर शिक्षकांसह 120 विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जयसिंगपूर : शहरातील शिक्षिकेला कोरोनाची लागण झाल्यानंतर इतर शिक्षकांसह 120 विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या स्वॅब अहवालाकडे लक्ष लागले आहे. नगरपालिका प्रशासन आणि प्राथमिक आरोग्य केंद्राची यंत्रणा या घटनेने "ऍक्शन मोड' मध्ये आली आहे. शिक्षक, विद्यार्थ्यांचे स्वॅब अहवालावरच आता शहरातील शाळांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. एकूणच शिक्षणनगरी असणाऱ्या जयसिंगपूरमधील शाळांवर कोरोनाचे संकट घोंघावत असल्याने प्रशासन दक्ष आहे.
शहरातील एका शाळेत पतीनंतर शिक्षिका पत्नीही कोरोना पॉझिटीव्ह असल्याच्या वृत्ताने शहरातील शाळांमध्ये खळबळ उडाली आहे. शिरोळ तालुक्यातील सर्वाधिक रुग्ण हे जयसिंगपूरमधील असून यामध्ये 43 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे पालिका आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्फे पुरेशी दक्षता घेतली जात असली तरी अद्यापही अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता केवळ कागदोपत्री रंगवली जात असल्याचेही वास्तव नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन प्रशासनाने शहरातील सर्वच शाळांची अचानकपणे तपासणी करुन सूचना देण्याची गरज आहे.
मुख्याधिकारी टिना गवळी, उपमुख्याधिकारी पवन म्हेत्रे, जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडूरंग खटावकर, नगरपालिका शिक्षण विभागाचे प्रभारी प्रशासन अधिकारी हणमंत बिराजदार, केंद्र प्रमुख मेघन देसाई यांनी शहरातील शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबद्दल विशेष दक्षता घेत वेळोवेळी शाळांना सूचना दिल्या आहेत. मात्र, तरीही शाळा पातळीवर अद्यापही याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. अनेक शाळांमध्ये विद्यार्थी तपासणीबरोबर स्वच्छतेकडेही गांभीर्याने पाहिले जात नसून विद्यार्थी सुरक्षितता केवळ कागदोपत्री रंगवली जात असून अशा शाळांवर कठोर कारवाईची मागणी पालकांमधून होत आहे.
35 गावातील विद्यार्थ्यांचा शहराशी संपर्क
शिक्षण नगरी असणाऱ्या जयसिंगपूरशी शिरोळ, हातकणंगलेसह कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील जवळपास 35 गावांचा संपर्क असतो. वेळीच गांभीर्याने पाहिले गेले नसल्याने विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हि 35 गावेही धोक्यात येणार आहेत. त्यामुळे शाळांमधील विद्यार्थी सुरक्षितता महत्वाची बनली आहे.
सर्वच शाळांनी याचा धडा
शहरातील विविध शाळांमध्ये शहर व परिसरातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोनाची दुसरी लाट गृहीत धरुन उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र, कोणत्याही शाळांनी विद्यार्थी सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्यास शाळांच्या मुख्याध्यापकांवर कठोर कारवाई केली जाईल. शिक्षिका पॉझिटीव्ह आढळल्यानंतर सर्वच शाळांनी याचा धडा घ्यावा.
- टिना गवळी, मुख्याधिकारी, जयसिंगपूर नगरपरिषद
- डॉ. पांडूरंग खटावकर, वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ.केंद्र, जयसिंगपूर
संपादन - सचिन चराटी
kolhapur