ओला दुष्काळ जाहीर करण्याची जनता दलची मागणी

अजित माद्याळे
Saturday, 17 October 2020

गेल्या काही दिवसापासून तालुक्‍यात जोरदार परतीचा पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, भात, ज्वारी, मिरची, भुईमूग या प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

गडहिंग्लज : गेल्या काही दिवसापासून तालुक्‍यात जोरदार परतीचा पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, भात, ज्वारी, मिरची, भुईमूग या प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे. यामुळे या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ भरपाई देण्यासह संपूर्ण कोल्हापूर जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जनता दलाने केली. 

गोडसाखरचे अध्यक्ष ऍड. श्रीपतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्ठमंडळाने याबाबत निवेदन देवून शासनाचे लक्ष वेधले. यात म्हटले आहे, तुफान पावसामुळे कृषी क्षेत्राला दणका बसला आहे. पिकांची दैना उडाली आहे. काढणीसाठी आलेली उभी पिके उद्‌ध्वस्त झाली आहेत. सोयाबीन व भात जागेवरच कुजलेले आहे. भुईमूग, मिरची, ज्वारीची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. भात आणि ऊस भुईसपाट झाले आहे. यामुळे उत्पादनाला फटका बसणार आहे.

या पिकांकडे नगदी पिक म्हणून शेतकरी पाहतात. सोयाबीन व उसापासून हमखास उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत असते. परंतु या पावसाने आर्थिक फटका बसणार आहे. यामुळे जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पंचनामे करून तत्काळ भरपाई द्यावी. सोयाबीनचेही मळणीच्यावेळी नुकसान झाले आहे. त्याचेही पंचनामे करून भरपाई द्यावी. अन्यथा शेतकऱ्यांना व शेतीवर अवलंबून असणाऱ्या नागरिकांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही. यामुळे तत्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी आणि जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.

ऍड. शिंदे यांच्यासह नगराध्यक्षा स्वाती कोरी, तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, कार्याध्यक्ष उदय कदम, उपनगराध्यक्ष महेश कोरी, नगरसेवक उदय पाटील, रमेश पाटील, नारायण शिंदे, ऍड. एस. आर. चनवीर, एस. बी. कमते, सागर पाटील यांच्या शिष्टमंडळाने प्रांत कार्यालयाला निवेदन दिले. जिल्हाधिकारी ते मुख्यमंत्र्यांपर्यंतही निवेदने पाठविली आहेत. 

पशुधन पाळणेही अवघड 
दरम्यान, शेतीला जोडधंदा असलेला दुग्धव्यवसायही अडचणीत आहे. जनावरांसाठीचा चारा पावसामुळे कुजला आहे. यामुळे पशुधन पाळणेही अवघड झाले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

 

संपादन -सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Janata Dal Demands Declaration Of Wet Drought Kolhapur Marathi News