प्रवासाला जाताय नो टेंशन ; बॅग घ्या भाड्याने

लुमाकांत नलवडे
Saturday, 24 October 2020

जयेश पाटील यांचा स्टार्टअप; ऑनलाईन घरपोच, २० ते २५० रुपये दिवसाचे भाडे

कोल्हापूर : एका क्‍लिकवर टॅक्‍सी दारात येते, फर्निचर भाड्याने मिळते; तर पर्यटनासाठी बॅग भाड्याने का मिळत नाही? या एका प्रश्‍नावर ‘रेडिओ मीडिया’मध्ये काम करणाऱ्या जयेश पाटील यांनी थेट बॅग भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला. 

नोकरी सोडून हा व्यवसाय सुरू करताना ग्राहकांची गरजही त्यांनी ओळखली. त्यांच्यामुळे पर्यटनासाठी जाताना नवीन बॅग खरेदी करण्याची गरज आता भासत नाही. भाडे तेही परवडणारे आणि बॅगही प्रवासाच्या योग्यतेची देण्याचे त्यांनी सुरू केले. पाच  हजाराच्या एका बॅगेवरून सुरू झालेला हा प्रवास ५० लाखांपर्यंत पोचला आहे. कोल्हापुरातून सुरू झालेला हा स्टार्टअप पुणे, मुंबईपर्यंत विस्तारला आहे. ग्राहकांची गरज आणि त्यांना अपेक्षित सेवा देऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे काम झाले तर तेथे स्टार्टअप सुरू होतो. त्यासाठी शिक्षणाची फॅकल्टी कधीच अडवी येत नाही.

हेही वाचा-भेंडीनेही खाल्ला भाव : दराने घेतली दीडशेची धाव -

कोणीही कोणताही अधिकृत व्यवसाय सुरू करू शकतो. याच कल्पनेतून आणि समस्या निकाकारण करण्याचा मूळचा स्वभाव असल्यामुळे पाटील यांनी अडीच वर्षापूर्वीच बॅग भाड्याने दिली तर ग्राहकांना ते आवडेल काय? ते बॅग भाड्याने घेतील काय? याबाबत त्यांनी रेल्वेस्थानक, बस स्थानक, टुरिस्टची कार्यालये, हॉटेल येथून माहिती घेऊन सर्वेक्षण केले. त्यातून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पुढे त्यांनी पाच हजार रुपयांची एक बॅग आणून व्यवसायाचा श्रीगणेशा केला. आता हाच व्यवसाय पन्नास लाखांपर्यंत पोचला आहे. सुरवातीला सेव्हिंगमधील गुंतवणूक केली. नंतर बॅंकेचे कर्ज घेतले आता काही गुंतवणूकदारांनी सहकार्य केले आहे. स्वतः बीएस्सी, एमबीए पर्यंत शिक्षण घेतलेल्या पाटील यांना क्रिएटिव्हीटीमध्ये काम करण्याची इच्छा होती. 

हेही वाचा- विधानसभेची वर्षपूर्ती ः आठ आमदारांना घरी बसवलेला निकाल -

रेडिओ मीडियामधून बाहेर पडल्यानंतर काय व्यवसाय करायचा, हा प्रश्‍न होता. त्यातून वेगवेगळ्या व्यवसायातून ही कल्पना मी प्रत्यक्षात आणली. पर्यटकांची व्यवस्था झाली आणि माझा व्यवसाय झाला. ग्राहकांचा खर्चाचा भार व्यवसायातून हलका करू शकतो, याचा एक आनंद आहे. देश-विदेशात व्यवसायाचा विस्तार करायचे ध्येय आहे. लवकरच देशातील १०० शहरांत ही सुविधा देणार आहे.
- जयेश पाटील, व्यावसायिक

हे आहेत ग्राहक
  परदेशी मुलांकडे जाणारे आई-वडील
  व्यवसायासाठी जाणारे नोकरदार
  ट्रेकिंगसाठी जाणारे ग्रुप
  सहलीसाठी जाणाऱ्या महिला
  लग्नाचा जत्था नेण्यासाठी ग्राहक 

सेवेची वैशिष्ट्ये...
 
ऑनलाईनद्वारे बॅग घरपोच 
  कोल्हापूरसह पुणे, मुंबईत सेवा
  नाममात्र डिपॉझिटवर बॅग
  वीस रुपयांपासून अडीचशे रुपयांपर्यंत दिवसाचे भाडे
  परदेशातून रिकामी बॅग परत आणण्याची सोय 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayesh Patil works in Radio Media started a business of renting bags directly