कुत्र्यांच्या पिल्लांना  वाचविण्यासाठी "जिया'ची धडपड​

 Jia's struggle to save the puppies
Jia's struggle to save the puppies


कोल्हापूर  : पंढरपूरची जिया शहा चंदगड तालुक्‍यातील गावांत "सावित्रायण' लघुपटाच्या चित्रीकरणासाठी आली. त्यावेळी तिला कुत्रीची पिल्ली घेऊन जाणारे लोक तिला दिसले. कुत्रीची एक-दोन पिल्ली घरी ठेवून उर्वरित नदीत सोडायला जात असल्याचे ऐकून तिला धक्का बसला. वर्षानुवर्षांची ही प्रथा सुरू असल्याचे कळताच ती गहिवरली. मग तिने कानूर परिसरातल्या गावांचा सर्व्हे सुरू केला. एकूण 111 कुत्र्यांची नोंद झाल्यावर कुत्र्यांच्या नसबंदीच्या शिबिराचा तिने निर्णय घेतला. मुक्‍या जीवांना मरणापासून वाचविण्याच्या तिच्या धडपडीला मित्र-परिवारांतून बळ मिळाले आणि अनिष्ट प्रथेविरुद्धचे तिचे पहिलं पाऊल कौतुकाचं ठरलं. 

जिया ही रशियात मेडिकलचे शिक्षण घेते. लघुपटाची मेडिकल कन्सल्टंट म्हणून काम करण्यासाठी चंदगड तालुक्‍यात तिने पाय ठेवला. कुत्र्यांच्या लहान पिल्लांना नदीत सोडण्याच्या प्रथेने ती अस्वस्थ झाली. तिने पुंद्रा, कानूर खुर्द, कानूर ब्‌ुद्रुक, मासुरे, सडेगुडवळे, पिळणी, भोगोली, बिजूर, कुरणी, गवसे, इब्राहिमपूर, कानडी गावांच्या भटकंतीत कुत्र्यांची गणती केली. पशुसंवर्धन खात्याचे उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांची भेट घेऊन या विचित्र प्रथेची माहिती दिली. कुत्र्यांची संख्या अधिक वाढू नये, यासाठी तेथे नसबंदीच्या शिबिराचे आयोजन करण्याची गरज तिने व्यक्त केली. डॉ. पठाण यांनी तिला सकारात्मक प्रतिसाद दिला. 
11 गावांतील लोकांना भेटून तिने कुत्र्यांच्या नसबंदीची माहिती दिली. त्या लोकांकडून ग्रीन सिग्नल आल्यानंतर तिने पदरमोड तर केली, शिवाय दानशूर व्यक्तींनी तिला आर्थिक सहकार्य केले. त्यानंतर शस्त्रक्रियेसाठी लागणारे बेल्ट, साखळ्या मुंबईतील एका एनजीओमध्ये काम करणाऱ्या अनुप्रिया शहाच्या मदतीने तिने मागवले. अनुप्रियासह सूरज मुधाळे, एकनाथ बांदिवडेकर, गंगाराम कांबळे, मनोहर बुरुड, किशोर बोकडे, मनस्विनी कांबळे, डॉ. अनिल परभणे, संतोष कांबळे, डॉ. चिकभिरे तिच्या मदतीसाठी धावून आले. कानूर, सडेगुडवळे, गवसे येथे दोनदिवसीय नसबंदीचे शिबिर यशस्वी झाले. 


कुत्र्यांच्या डोळे न उघडलेल्या पिल्लांना नदीत सोडणे वाईट. मात्र, ते करण्यामागे लोकांची भावना पशूधनाशी जोडली आहे. तालुक्‍यातील दुर्गम गावांत आर्थिक स्थिती चांगली नाही. कुत्र्यांची संख्या वाढून त्यांना खायला काही मिळाले नाहीतर ते थेट पशूधनावर हल्ला करतात. हिंस्र होऊन लोकांना चावतात. पिल्लांना नदीत टाकण्याऐवजी कुत्र्यांची नसबंदी हा त्यावर सर्वोत्तम पर्याय आहे. 
- जिया शहा 

तालुक्‍यातील कुत्र्यांचा सर्व्हे करण्यास सांगितले आहे. त्यानंतर ठिकठिकाणी नसबंदी शिबिरे घेणार आहोत. भटक्‍या कुत्र्यांची संख्या आटोक्‍यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. 
- डॉ. वाय. ए. पठाण, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com